www.24taas.com,मुंबई
मुंबईत १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘अमर जवान’ क्रांतिस्तंभावर हल्ला करणाऱ्या धर्मांध आंदोलकांची पोलिसांना माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.
शहीदांच्या पवित्र स्तंभाची विटंबना करणाऱ्या आंदोलकांना त्वरित अटक करून त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणीही खासदार चंद्रशेखर यांनी केली आहे.
धर्मांध आंदोलकांच्या या निंदनीय कृत्याने आपल्यासह देशातील हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांना असह्य वेदना झाल्या आहेत. आंदोलकांच्या या कृत्याने लोकांच्या मनात संताप आहे. या पवित्र स्तंभाची विटंबना करणारे आंदोलक मोकाट सुटता कामा नयेत, अशी भावना चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.
वास्तविक त्यांच्या या कृत्याने देशातील सर्वच लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली असून देशाच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे, असा आरोप चंद्रशेखर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. राजीव चंद्रशेखर हे नॅशनल मिलिटरी मेमोरिअल कमिटीचे चेअरमनदेखील आहेत.