दिनेश दुखंडे, झी मिडिया, मुंबई: यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडतोय. पावसामुळं हुकलेल्या वर्धापन दिनाच्या खेळीची कसर भरुन काढण्याची तयारी शिवसैनिकांनी केलीय. शिवसेना भाजप वादामुळे अवघ्या देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलंय.
आणखी वाचा - शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी
शिवाजी पार्कची खेळपट्टी तयार झालीय... शिवसेना तयारीनिशी आणि संपूर्ण ताकदीसह खेळायला उतरतेय. गेली पंधरा वर्षं विरोधी पक्षात असलेली शिवेसना यंदा सत्तेत असल्यानं फॉर्मात आहे. पण भाजपशी मतभेद झाल्यानं सूर हरवलाय. संघाचे कप्तान उद्धव ठाकरे यांच्यावरच पक्षातल्या खेळाडूंची भिस्त आहे. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजप हा शिवसेनेचा प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे उद्धव यांच्याकडून चांगल्या कामगिरीची शिवसैनिकांची अपेक्षा आहे. भाजप विरोधी चौकार आणि षटकार ठोकून ते सामन्यात रंगत आणू शकतात.
आणखी वाचा - पोस्टरबाजीवर भाजपचा शिवसेनेला कडक इशारा
पाकिस्तानी कलावंत, खेळाडू आणि राजकारण्यांना महाराष्ट्रात मज्जाव करत शिेवसेनेनं भाजपविरोधी आघाडी घेतलीय. पण अनुभवी बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत याची जाणीव शिवसैनिकांना आहे. कल्याण डोंबिवली आणि त्यापाठोपाठ मुंबई-ठाणे महापालिकेवर भगवा कायम ठेवण्याचं आव्हान शिवसेनेपुढं आहे. देशात आणि महाराष्ट्रात सत्ता कबीज केल्यानंतर भाजपचं पुढचं लक्ष्य मुंबई आहे. त्यामुळं दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना आपल्या शिलेदारांपुढे पक्षाची पुढची वाटचाल अधिक स्पष्टपणे मांडावी लागणाराय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.