मुंबई : मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.
मुंबई... एक असं शहर जे सतत दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतं. १९९३ चा साखळी बम्बस्फोट असेल, लोकल ट्रेनमध्ये झालेलं बॉम्ब स्फोट असतील किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला. मुंबई ही नेहमीच आरडीएक्सच्या ढिगा-यावर असते. त्यामुळे कधी कोणत्या बेवारस वस्तू मध्ये बॉम्बस्फोट होईल याचा नेम नाही. याकरता मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. त्यानुसार अत्याधुनिक यंत्रणेसह प्रशिक्षित पोलीस कर्मचारी अधिका-यांची भरती या बॉम्ब स्क्वाडमध्ये केली जाणार होती. पण तसं होताना मात्र दिसलं नाही.
अधिक वाचा - २६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
बॉम्ब स्क्वाडचं आधुनिकरण सोडा या बॉम्ब स्क्वाडमध्ये रिक्त असलेली पदंदेखील भरण्यात आली नाहीत. माहितीच्या अधिकारात उघड झालेल्या या माहितीनुसार बॉम्ब स्क्वाड पथकात वरीष्ठ पातळीवरची पदं वर्षानुवर्षं रिक्त आहेत.
मुंबई बॉम्ब शोधक पथकात एकूण १६४ शासनमान्य मंजूर पदं आहेत. त्यापैंकी एकूण १४४ पदांवर पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैंकी सर्वात महत्त्वाचं पद जे सर्वात जास्त कार्यरत असतं त्या 'पोलीस उप निरीक्षक' पदांवर १७ पैकी फक्त ४ पदांवरच पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. म्हणजे, मुंबई बॉम्ब शोधक व नाशक पथकात पोलीस उप निरीक्षकांची तब्बल १३ पदं रिक्त आहेत. तर पोलीस हवालदार दर्इजाची १८ पैकी ७ पदं, पोलीस शिपाई दर्जाची ४३ पैंकी २५ पदं, पोलीस शिपाई हस्तकाचं एक पद, तर पोलीस शिपाई चालकाची २ पदं रिक्त आहेत. गंमतीचा भाग म्हणजे २३ पोलीस शिपायांची अतिरिक्त भरती करण्यात आलीय. त्यामुळे एखादी बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तू सापडल्याचा फोन आल्यास या बॉम्ब शोधक पथकांची काय त्रेधा तिरपीट होत असेल ते तुमच्या लक्षात आलंच असेल.
खरं तर मुंबई पोलीस दलात मुळात मंजूर पदांपैकी हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका पोलीसाला किमान दोन पोलिसांचं काम करावं लागतं ही वस्तूस्थिती आहे. दुसरीकडे पोलिसांचं सक्षमीकरणाच्या बाता केल्या जातात. पण मुळात असं काही होताना दिसत नाही. त्यामुळे तसं न घडो पण पुन्हा कधी बॉम्बस्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? हा प्रश्न आता जनता विचारतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.