मुंबई : ‘सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजप युती राहिल असं वाटत नाही’, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘झी 24 तास’च्या रोखठोक कार्यक्रमात केलं. यामुळे, ‘झी 24 तास’नं तीन दिवसांपूर्वी दिलेल्या युती तुटल्याच्या वृत्तावर खडसे यांनी शिक्कामोर्तबच केलंय.
याचसोबत, युती तुटण्यामागे शरद पवार यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं धक्कादायक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. तसंच, जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना पाठवलं, हे अयोग्य असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. ओम माथूर यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याबरोबर चर्चा करायला आदित्यला पाठवलं, याचं वाईट वाटल्याची भावना खडसेंनी 'झी 24 तास'वरील 'रोखठोक' कार्यक्रमात व्यक्त केलीय.
घटकपक्षांची भूमिका महत्त्वाची…
शिवसेना भाजप युती तुटलीय. मात्र आता महायुतीतल्या घटकपक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. हे घटकपक्ष सध्या तरी भाजपसोबतच जात असल्याचं चित्र आहे. एवढच नाही तर शिवसेना वगळून महायुती कायम राहील असाही घटकपक्षांचा दावा आहे. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. तर विजयाच्या जागा देणाऱ्यासोबतच जाणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.