अनैतिक संबंधातून लैलासह कुटुंबियांची हत्या

लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.

Updated: Jul 11, 2012, 05:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.

 

इगतपुरीजवळच्या लैला खानच्या बंगल्यावर टाकलेल्या धाडीनंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झालाय. या बंगल्यातून सहा सांगाड्यांसह चाकू, रॉड आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आल्याचं हिमांशू रॉय यांनी सांगितलंय. यातल्या तीन तीन कवट्या फुटलेल्या अवस्थेत होत्या. तर तीन सांगाड्यांवर काही दागिनेही पोलिसांना आढळलेत. या सहाही सांगाड्यांना सध्या डीएनए चाचणीसाठी पाठविलं गेलंय. या चाचणीनंतर हे मृतदेह कुणाकुणाचे आहेत हे स्पष्ट होऊ शकेल.

 

अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या प्रापर्टीसाठी झाल्याचा संशय अजूनही कायम आहे. तसंच अनैतिक संबंधांमुळे या हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. लैलाची आई सेलिना खान आणि आसिफची जोडीही परवेझला खटकत होती. परवेझ हा लैलाची आई सेलिना पटेलचा तिसरा नवरा होता. त्यामुळे त्यांचे नेहमी वाद होत होते. त्यामुळे परवेझनं सर्वात आधी सेलिनाचा काटा काढला पण तिची हत्या करताना कुटुंबीयांनी पाहिलं त्यामुळे पुढचं हत्याकांड घडल्याचं परवेझनं म्हटलंय. या हत्येत फार्म हाऊसवरचा नोकर शाकिरही सहभागी होता.

 

हत्येनंतर परवेझ आणि शाकिरने एक सहा फूट खोल खड्डा खोदला आणि सर्व मृतदेह एकाच ठिकाणी पुरून टाकले. लैलाच्या फार्म हाऊस परिसरात सापडलेले सहा मानवी सांगडे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. डीएनए चाचणीत सांगाळ्यांची ओळख पटवली जाणार असल्याचे रॉय यांनी सांगितले. यावेळी सापडलेल्या पुराव्यांचा आणि दहशतवादाचा काही संबंध आहे का, याचीही तपासणी होणार असल्याचं पोलिसांनी यावेळी म्हटलंय.