औरंगाबाद : पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
प्रवास करताना चुकीने अपघात झाला आणि पत्नीलाच नुकसान भरपाई देण्याची वेळ औरंगाबादच्या श्रीराम काकडेंवर आलीय. पती निष्काळजीपणे गाडी चालवत होता त्यामुळे आपल्याला अपंगत्व आले, असा दावा पत्नीने केला आणि मोटार अपघात न्यायाधिकरणांत धाव घेतली.
झाले असे की पत्नी दयासागर काकडे आणि त्यांचे पती श्रीराम काकडे माजलगावहून मोटारसायकलवरुन पैठणला निघाले होते. रस्त्यावर एक कुत्रा आडवा आला आणि पती पत्नी गाडीवरून पडले, यात श्रीरामसह पत्नी दयाबाई जखमी झाल्या. दयाबाईंच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना सुरुवातीला बीड आणि नंतर औरंगाबादेत उपचार करण्यात आले. पत्नीच्या मते, या अपघाताला भरधाव गाडी चालवणारा पतीच कारणीभूत आहे, त्यामुळे त्यांनी पतीविरोधात दावा केला होता.
न्यायालयानंही याबाबत दयासागर यांच्याबाजूने निकाल देत पती आणि विमा कंपनीला थर्ड पार्टी विमाअंतर्गत 2 लाख 64 हजार रुपये व्याजसह देण्याचे आदेश दिलेत. यासंदर्भात काय बोलावं या विवंचनेत पती श्रीराम काकडे आहेत...न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
महत्वाचं म्हणजे दयासागर आणि श्रीराम न्यायालयीन लढाई सुरु असताना एकाच घरात राहिले. पती आणि पत्नी यांच्यात त्यामुळे काही काळ वादही झाला. मात्र द्यासागर नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर ठाम राहिल्या. पतीकडून अपघात झाल्याने नुकसान भरपाई वसूल करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.