संतोष रहाटकर, बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निनाभाऊ कोकरे आश्रम शाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका बालिकेवर इथल्या कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल करून ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेतली असून ते या प्रकरणात स्वतः लक्ष ठेवून आहेत. तर महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पाळा येथे येऊन संपूर्ण आश्रम शाळेची पाहणी केली असता शाळेत मोठ्या प्रमाणावर असुविधा असून या ठिकाणी कुठलीच सुरक्षितता नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यातील आश्रम शाळांची पाहणी करून, ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे सुविधा नसतील त्या सर्व आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तर पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून दोन लाख रुपयाची मदत देण्यात आली असून तिची काऊन्सिलिंग करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत पोलीस प्रशासन योग्य प्रकारे काम करत असून त्यांना आपण वेळ दिला पाहिचे असं म्हणत त्यांनी या सर्व गोष्टीला संस्थाचालकांचं जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाळा आश्रमशाळेतील या प्रकारानंतर आता राज्यातील सर्वच आश्रमशाळांची तपासणी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.