नाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर

अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला. 

Updated: Jan 7, 2017, 07:24 PM IST
नाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर title=

नाशिक : अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला. गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र ठरलेल्या या बाजारावर कारवाई होऊ नये यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय दबाव सुरु होता. मात्र अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार ऐतिहासिक कारवाई करण्यात आलीय. 

नाशिकमध्ये गेल्या 17 वर्षांपासून अनधिकृतपणे सुरु असलेल्या भंगाराच्या बाजारावर जेसीबीचा हा पंजा पडतोय. ही कारवाई होतेय भंगार बाजाराच्या आडून सुरु असलेल्या गुन्हेगारी कारवाया होत होत्या. गुन्हेगारांच्या मनसुब्यांवर आणि त्याच्यावर वरदहस्त ठेवणा-या राजकीय नेत्यांच्या इराद्यांवर पाणी पडले आहे.

सातपूरच्या अंबड लिंक रोडवर साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रहिवाशी भागात जवळपास 75 ते 80 एकरावर हा बाजार थाटण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्यात म्हणजेच सुमारे 25 एकर जागेवरील शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे.

गेल्या चार साडेचार वर्षांपासून हा बाजार हटविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु होती. जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च  न्यायालयापर्यंत सगळ्यांनीच अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्याचे पालिकेला आदेश दिलेत. मात्र अधिकारी आणि पदाधिकारी कारवाई काहीतरी कारण पुढे करून  करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर पोलीस बाळाच्या जोरावर शनिवारचा मुहूर्त ठरला. 

मात्र त्यातही स्थानिक आमदारांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेच कारण पुढे करून शेवटच्या क्षणापर्यंत खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केलाय. तर मनपा अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटविताना दुजाभाव केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

नाशिक पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आलीय. मात्र यांत पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचाच दोष असल्याचा आरोप होतोय. कारण हा बाजार इथं बस्तान मांडत असताना त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप होतोय. अखेर न्यायालयाच्या दणक्याने उशिरा का होईना कारवाई झाली, याबाबत समाधान व्यक्त होत आहे.