पुणे : देशसेवा अन देशभक्तीचं प्रतीक म्हणजे भारतीय सशस्त्र सेना. एनडीएतील १३१ व्या तुकडीचे छात्र आज हा गौरव प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. यानिमित्तानं एनडीएतील खेतपाल मैदानावर छात्रांचं शिस्तबद्द असं दीक्षांत संचलन झालं.
देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर एनडीएच्या प्रशिक्षणकाळात विशेष कामगिरी बाजवलेल्या छात्रांचा सुवर्ण, रौप्य तसेच कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला. दीक्षांत संचलनांनंतर छात्रांनी केलेला जल्लोष याविषयी बरंच काही सांगून जातो.
छात्रांचं दीक्षांत संचलन हा एनडीएसाठी गौरवास्पद दिवस असल्याचं प्रतिपादन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या डॉ सुभाष भामरे यांनी केलं. आजवर अनेक प्रसंगी एनडीएच्या छात्रांनी सर्वोच्च त्याग केलाय. त्याचा देशाला अभिमान असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दीक्षांत संचलनानंतर हवाई दलाच्या पथकानं सादर केलेल्या हवाई कसरती अचंबित करणाऱ्या होत्या. सूर्यकिरण विमानांची आकाशातील फॉर्मेशन्स पाहून प्रत्येकाचं उर अभिमानानं भरून येणार नसेल तरच नवल. खरंतर हा संपूर्ण सोहळा हा केवळ एका संस्थेचा उपचार नव्हे, तर ती राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीची अनुभूती आहे.