खाकी वर्दीही रंगली विठ्ठल नामात

समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच काम करताना पोलिसांना गणपती उत्सव, मोहरमसह इतर सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, आषाढी यात्रा या खाकी वर्दिलाही आपल्यातील हरिनामाच्या ओढीची आठवण करून देते. यातूनच अहमदनगर मधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थाने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणार्या पांडुरंगाचा धावा करतात. 

Updated: Jul 17, 2015, 08:11 PM IST
खाकी वर्दीही रंगली विठ्ठल नामात title=

अहमदनगर : समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच काम करताना पोलिसांना गणपती उत्सव, मोहरमसह इतर सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, आषाढी यात्रा या खाकी वर्दिलाही आपल्यातील हरिनामाच्या ओढीची आठवण करून देते. यातूनच अहमदनगर मधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थाने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणार्या पांडुरंगाचा धावा करतात. 

महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व समाज घटक उच्च निच भेद विसरून सहभागी होतात. पंढरीचा विठोबा त्यांच्यासाठी मायबाप असतो. कर्तव्य बजावत असल्याने पोलिसांना घरी वेळ देता येत नाहि. त्यामुळे त्यांच्यासाठी वारी करणे शक्यच नसते. अशा वेळी अहमदनगर मधील एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून गेल्या ३६ वर्षापासून दिंडीचे स्वागत करण्यात येते. 

विठू रायाच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते. या सेवेपासून अहमदनगरमधील पोलिसही लांब राहिलेले नाहीत. मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीची सेवा अहमदनगरमधील पोलीस दरवर्षी करतात. एव्हढेच नाही तर वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलिसही हरिनामाचा गजर करतात. 

मालेगावहून येणार्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीच्या स्वागताची प्रथा १९८१ मध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षक शेख यांनी सुरु केली. ती आजही पाळली जात आहे. अधिकारी कर्मचारी बदलून गेले तरी नवीन आलेले अधिकारी पोलिस ठाण्याची ही परंपरा पाळत आहेत, असं दिंडी प्रमुख पिंपळगाव महाराज सांगतात.

पोलिसच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही या स्वागत सोहळ्यात सहभागी होतात. अहमदनगरमधील हे पोलीस खाकी वर्दीच्या आत दडलेल्या भक्तीच दर्शन घडवतात. वारकऱ्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गणी करून करतात. वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्याची सेवा करून पोलीस पुण्याचं काम करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.