संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये झी 24 तास आज घेऊन आलाय सोलापूर जिल्ह्यातला रणसंग्राम... काँग्रेस याठिकाणी आपलं वर्चस्व टिकवतं? की, राष्ट्रवादी किंवा भाजप बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.
सोलापूर जिल्ह्यातल्या 11 नगरपालिकांपैकी 9 नगरपालिकांच्या 27 नोव्हेंबरला निवडणुका होणारेत... स्थानिक पातळीवर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी सर्वच पक्षांनी आणि इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केलीय.
सोलापुरातील बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी आणि दुधनी नगरपालिकांच्या निवडणुका होणारेत... त्यातल्या अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, करमाळा या नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत. बार्शी, मंगळवेढा नगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत. तर कुर्डुवाडी नगरपालिका शिवशक्ती-भिमशक्ती-मुस्लिमशक्तीकडे आणि पंढरपूर नगरपालिका भाजपकडे आहेत.
- सांगोला नगरपालिकेत सध्या शेकाप आमदार गणपत देशमुख, राष्ट्रवादीते माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. यंदा मात्र यातला एकही गट एकत्र येण्याची चिन्ह नसल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल.
- पंढरपूर नगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडे पालिकेची सत्ता आहे. परिचारक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यानं राष्ट्रवादीला याठिकाणी चेहराच नाही. भारत भालकेंवर काँग्रेसची मदार असेल.
- करमाळ्याला एक खांबी नेतृत्व नसल्यानं हा तालुका गटातटाच्या राजकारणात विखुरला गेलाय. काँग्रेस नेते जयवंतराव जगताप, राष्ट्रवादीचे शामल बगल, सेनेचे नारायण पाटील यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय.
- कुर्डूवाडी नगरपालिकेत कुठल्याही एका पक्षाची किंवा गटाची सत्ता नाही. सध्या सेना आणि आरपीआयकडे ही पालिका आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे आमदार असूनही केवळ त्यांचा एकच नगरसेवक आहे.
- विधानसभा फेररचनेत मंगळवेढा पंढरपूरला जोडला गेल्यानं इथलं स्थानिक राजकारण बदलून गेल्या. सध्या याठिकाणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले समाधान अवताडे गटाची सत्ता आहे. यावेळी भालके गट, अवताडे गट आणि परिचारक गटात चुरशीची लढत होईल अशी शक्यताय.
- बार्शी नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असून आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचं चित्र आहे.
- अक्कलकोट आणि मैंदर्गी नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
- दुधनी नगरपालिकाही काँग्रेसकडे आहे. या नगरपालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच 1950 पासून या पालिकेवर काँग्रेसचीच सत्ता आहे.
- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भोवती सोलापूर जिल्ह्याचं राजकारण फिरतं.... राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही सोलापूर जिल्हा ओळखला जातो. मात्र सध्या हा किल्ला ढासळायला लागलाय. राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे नेते संजयमामा शिंदे, भाजप आणि स्वाभिमानीमध्ये दाखल झाल्यानं राष्ट्रवादीची काहीशी पीछेहाट झालीय. तसंच भाजपची जिल्ह्यात वाढती ताकद लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादीला अधिक मेहनत घ्यावी लागणारेय.
आता सोलापुरात पुन्हा काँग्रेस वर्चस्व निर्माण करतो की अन्य पक्ष शिरकाव करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.