मुंबई : गणपतीसाठी दरवर्षी गावाला जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा पुन्हा एकदा कोकण रेल्वेने घात केला. यंदा १७ सप्टेंबरला गणेशचतुर्थीचा सण येतोय. त्यामुळं १२० दिवस आधी रेल्वेच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी तिकीट विंडोबाहेर चाकरमान्यांनी रात्रभर लाइन लावली. मात्र एवढं करूनही अनेकांच्या नशिबी वेटिंग तिकीटच आलं.
काही मोजक्या भाग्यवंतांचा अपवाद वगळता, कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या अवघ्या काही मिनिटांत बूक झाल्यात. राज्यराणी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी आदी सगळ्याच गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
इंटरनेटवरून ई-तिकीट काढणाऱ्या ऑनलाइन ग्राहकांच्या पदरीही अशीच निराशा पडली. IRCTC च्या वेबसाइटवर लॉगइन होत नाही, तोच रिग्रेट आणि वेटिंगचा मेसेज स्क्रीनवर झळकू लागला. काहींचे पैसे IRCTC ने घेतले, मात्र तिकीट बुकिंग फेल झाल्याचे मेसेज त्यांना आले. म्हणजे तिकीट मिळालं नाहीच, वर आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला.
काही सेकंदाच रेल्वे फूल्ल झाल्यामुळं चाकरमानी पुन्हा एकदा कोकण रेल्वेच्या नावानं शिमगा करतायत. गणपतीसाठी कोकण रेल्वेनं जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना वेटिंगवर ताटकळत राहावं लागतंय. मात्र, याबाबत कोकण रेल्वे काहीही करताना दिसत नाही. यापाठीमागे दलाल आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.