प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता वेगानं पुढे सरकत आहे. पानसरे यांच्या हत्येबाबत समीरचे दोन संभाषण पोलिसांना सापडले आहेत. मैत्रिण ज्योती कांबळे सोबत बोलतांना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं.
आज समीर गायकवाडची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. समीर गायकवाडची पोलीस कोठडी आता २६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय.
आणखी वाचा - पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता
पोलिसांनी समीरच्या घरातून २३ मोबाईल फोन, १ चाकू आणि त्याची डायरी जप्त केलीय. या डायरीमधून त्याचा रुद्र पाटीलचा संबंध असल्याचा उल्लेख असल्याचं कळतंय.
कोर्टात सरकारी वकीलांनी मांडलेले मुद्दे -
१. समीर आणि ज्योती कांबळे यांच्या संभाषणातून पानसरे हत्येचा उलगडा.
२. रुद्रगौडा पाटील याच्याशी समीरचे संबंध असल्याचे उघड.
३. अंजली या समीरच्या बहिणीशी झालेल्या संभाषणातूनही पोलिसांना पुरावे.
४. ३१ सिमकार्ड जप्त... ३१ सिमकार्डचा तपास करायचा आहे. त्यावरुन कोणाशी आणि कधी संपर्क साधण्यात आला याबद्दल तपास करायचा आहे. त्यामुळं समोरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी.
५. समीर पोलिसांशी तपासात सहकार्य करत नाही. समीरच्या चौकशी वेळी बचाव पक्षाच्या वकिलांना उपस्थित राहण्याची मुभा असल्यानं तपासात अडथळे.
६. समीरच्या आवाजाचे नमुने मुंबईतील फोरेन्सिक लँबला पाठवले असता त्यांचा रिपोर्ट डिसेप्टिव्ह आहे. गुजरातच्या लँबचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे.
७. रुद्रगौडा आणि समीर गेल्या अनेक महिन्यांपासून संपर्कात असल्याचा तपास पथकाचा दावा.
८. कोल्हापूर बार असोसिएशनं समीर गायकवाडचं वकीलपत्र न घेता बहिष्कार टाकल्यानं सनातनकडून बाहेरच्या शहरांमधून वकिलांची फौज... न्यायालय सनातनच्या वकिलांनी भरलं.
९. हत्येच्या दिवशी समीर गायकवाड ठाण्यात होता.
१०. पोलिसांनी न्यायालयात समीर गायकवाडच्या फोन कॉलचं ट्रान्सक्रिप्शन सादर केलं.
दरम्यान, नुसत्या कल्पनाशक्तीच्या जोरावर कुणाला अटक करून चालणार नाही, असा दावा आरोपीच्या वकीलांनी केलाय.
समीर गायकवाडच्या वकीलांनी कोर्टात मांडलेले मुद्दे -
१. रुद्र पाटील याच्याशी समीरचा संबंध नाही.
२. घटनेच्या दिवशी समीर गायकवाड ठाण्यात होता, मग तो हत्या कशी करू शकतो.
३. दाभोलकर हत्येच्या प्रकरणातही चुकीच्या पद्धतीनं तपास झाला.
४. २ कोटी कॉल तपासले मग अजून तपास का करायचाय.
५. हे सगळं मीडियाच्या दबावामुळं सुरू आहे.
आणखी वाचा - गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आणखी चौघांना अटक
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.