अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसित केले आहे, यामुळे फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. या संयंत्राच्या वापरातून गृहोद्योगनिर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला गेला आहे.
कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी उत्पादने वाळवावी लागतात. धान्य, भाजीपाला, फळे उघड्यावर सूर्यप्रकाशात वाळविण्याची पूर्वापर पद्धत आहे.
या पारंपरिक पद्धतीने कृषी उत्पादनाची नासाडी तर होतेच; शिवाय,पदार्थांचा रंग, चव व गुणवत्ता कायम राहत नाही. याचा विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अपारंपरिक उर्जास्रोत विभागाच्या शास्त्रज्ञांनी सोलर टनेल ड्रायर विकसित केले आहे.
या सौरऊर्जा वाळवणी यंत्रामधून महागडी पिके म्हणजेच औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद इत्यादींसह मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला, तसेच फळं वाळवता येतात.
या ड्रायरची कृषी उत्पादने वाळविण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे. या ड्रायरमध्ये सूर्याची अतिनिल किरणे आत शिरत नसल्याने पदार्थांची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होत असून, वेळेची बचत होते.
हिवाळ्यात या सोलर टनेर ड्रायरचा उपयोग आवळ्यापासून उत्तम प्रतीची आवळा कँडी, आवळा सुपारी तयार करण्यासाठी केला जातो. हिरवा भाजीपाला, मेथी, पालक, कोथिंबीर आदी सुकविण्याकरिताही ड्रायरचा उपयोग होत असून, बटाटा चिप्स सुकविण्याकरिता हे संयंत्र अतिशय उपयुक्त ठरलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.