मुंबई : नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.
या पोस्टमध्ये, केवळ पंकजा मुंडेंचा ओळखल्यामुळे एक हरवलेला चिमुरडा आपल्या घरी सुखरुप कसा पोहचला, हे सांगण्यात आलंय.
परळी : राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची लोकप्रियता जनसामान्यांपर्यंत एवढी पोहोचली आहे की त्यांचा बॅनरवरचा फोटो ओळखून सहा वर्षे वयाच्या बेपत्ता झालेल्या लहानग्यास त्याच्या आई - वडिलांपर्यत सुखरूपपणे पोहोचविण्यात पोलिसांना यश आले.
त्याचे असे झाले की, परळी शहरातील भीमनगर भागातील रहिवासी असलेला व बांधकाम मजूर म्हणून काम करणारा केशव वैजनाथ आदोडे हा आपली पत्नी अर्चना व सहा वर्षे वयाचा मुलगा सुशील याच्यासह देवदर्शनासाठी चंद्रपूरला गेला होता. परत येताना 30 एप्रिल रोजी नांदेड येथे बहिणीकडील पाहूणचार आटोपून तो परळीला जाण्यासाठी पत्नी व मुलाला घेऊन नांदेड रेल्वे स्थानकावर आला. प्रवाशांच्या गर्दीत सुशील आईचा हात सोडून स्थानकाबाहेर कधी गेला, हे त्यांनाही कळाले नाही. ज्यावेळी सुशील बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगून जाणाऱ्या - येणाऱ्या सर्व रेल्वे तपासल्या, पण कुठेही त्याचा शोध लागला नाही. इकडे हरवलेला सुशील स्थानकाबाहेर आला खरा...पण काहीच कळत नसल्याने तो नरसी नायगावकडे जाणाऱ्या प्रवाशी जीपमध्ये बसला. नरसी नायगाव येथे सर्व प्रवासी उतरले पण हा एकटाच राहिल्याने चालकाने त्याची चौकशी केली पण त्याला काहीच बोलता न आल्याने चालकही हतबल झाला, शेवटी त्याने पोलिसांना बोलावले.
ना. पंकजाताई मुंडे ह्या 30 तारखेला नांदेड दौऱ्यावर होत्या. नायगाव नरसी येथे त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. सुशीलची नजर त्या बॅनरकडे गेली आणि त्याने त्यावर असलेल्या ना. पंकजाताई यांच्या फोटोकडे बोट दाखवून मी ह्यांच्या गावचा आहे, एवढेच पोलिसांना सांगितले. मग काय तपासाची सुञे वेगाने हलली आणि नांदेड पोलिसांनी बीड व परळी पोलिसाच्या मदतीने सुशीलला भीमनगर मध्ये त्याच्या आई - वडिलांकडे सुखरूप पोहोचवले. हरवलेला सुशील पाहून चिंतेने व्याकुळ झालेल्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही, सुशीलही तिच्या कुशीत अलगदपणे विसावला. केवळ पंकजाताईंच्या फोटोमुळे माझा मुलगा मला परत मिळाला... तो फोटो नसता तर... या नुसत्या विचारानेच केशव आदोडेचे डोळे पाणावले.
'झी २४ तास' या पोस्टची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.