मुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा

जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली. 

Updated: Feb 21, 2015, 08:27 PM IST
मुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा title=

नाशिक : जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली. 

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांना अखेरचा निरोप देण्याकरता, अलोट जनसागर पंचगंगेच्या काठी जमला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, समाजकारणातल्या या महत्त्वाच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कोल्हापूरला जाणं महत्त्वाचं वाटलं नाही. त्यावेळी मुख्यमंत्री नाशिकमध्ये कार्यक्रमाला उपस्थित होते. 

एका महत्त्वाच्या सामाजिक कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली जाते. आणि पोलीस गुन्हेगारांना शोधून काढतील एवढंच साचेबंद उत्तर मुख्यमंत्री देतात. मात्र जनतेचा आणि सरकारचा प्रमुख म्हणून, मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरला पानसरेंच्या अंत्यविधीला जावंसं वाटलं नाही, ही कोणती संवेदनशीलता म्हणायची? असा सवाल जनता विचारतेय. 

दरम्यान, कॉम्रेड पानसरेंवर झालेला हल्ला हे पोलिसांचं अपयश नसून, व्यवस्थेचं अपयश असल्याची हतबलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. तसंच पानसरेंवरील हल्ला हा व्यवस्थेला आवाहन देण्याचा प्रयत्न असून, कुठल्याही परिस्थितीत हल्लेखोरांना शोधून काढणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

'पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हायला हवे होते'
कॉम्रेड गोविंद पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हायला हवे होते अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.