बेळगाव : बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासीयांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासीयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनंती केल्यानंतर हा गोंधळ थांबला आणि त्यानंतर उदघाटन सोहळा पार पडला.
बेळगावर माझं प्रेम - शरद पवार
बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपलं बेळगाववर प्रेम असल्याचं सांगितलं. सीमा विभागल्या असल्या तरी मने दुभंगली नसल्याचं पवार म्हणाले. तर सरकारने नाट्य कलाकारांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असंही मत पवार यांनी व्यक्त केलं.बेळगाववर प्रेम असल्याचं सांगणा-या शरद पवार यांनी भाषणाच्या शेवटी मात्र महाराष्ट्राचं नाव घेणं खुबीने टाळलं
मुख्यमंत्र्यांची दांडी
बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गैरहजेर होते. मात्र इतर अनेक मान्यवर या सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष अरुण काकडे यांनी नव्या अध्यक्षा फय्याज यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सुपूर्द केला.
उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर मोहन जोशी, दीपक करंजीकर, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, लता नार्वेकर आदी उपस्थित होते. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सध्याच्या नाट्य-चित्रपटसृष्टीवर ताशेरे ओढले. सिनेमा-मालिकांमध्ये चमकणा-या सेलिब्रिटींनी नाटकांमध्ये काम करणं टाळणं ही खेदाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या. तर मुंबई-पुण्याबाहेर रंगभूमी कधी जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.