मुंबई: आशियातील दुसऱ्या क्रमांकाची आणि देशातील सर्वात मोठी समजली जाणारी धारावी झोपडपट्टी कुणाच्या ताब्यात येणार यासाठी धारावी मतदारसंघात पाच उमेदवार उभे आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून धारावी मतदारसंघाकडे पाहिलं जातं.
आमदार आणि महिला व बाल विकास मंत्री राहिलेल्या वर्षा गायकवाड यांनाच काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. तर गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत एक टर्म आमदार राहिलेले शिवसेनेचे बाबुराव माने यांना पुन्हा एकदा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.
धारावीच्या चिखलात कमळ फुलवण्यासाठी एक तरुण आणि उच्च शिक्षित महिला उमेदवार दिव्या ढोले यांना भाजप-आरपीआयने उमेदवारी दिलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोंविदभाई परमार आणि मनसेकडून गणेश खडे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सर्वच उमेदवारांनी धारावीतल्या झोपड्यांमध्ये जावून मतं मागण्यास सुरुवात केलीय.
डोअर टू डोअर प्रचार याठिकाणी केला जातोय. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्न उमेदवरांचा राहणार आहे. धारावीत सर्व समाजाचे मतदार वास्तव्यास असले तरी दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. तसंच धारावीत छोटे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. धारावीच्या जागेची किंमतही दिवसेंदिवस वाढत चाललीय.
यासगळ्याची सांगड घालत इथल्या मतदारांना आता धारावीचा विकास हवा आहे. आजही इथले मतदार मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. धारावी पुर्नविकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सत्ता असूनही अनेक विकासकामे रखडली असल्याचं मत मतदारांकडून व्यक्त होत असताना आता इथली जनता धारावी कुणाकडे सोपवते हे पाहणं महत्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.