पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि दूरदर्शनच्या 'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत गणपत हवालदाराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते अजय वढावकर (५९) याचं आज पुण्यात शुक्रवारी निधन झालं. वढावकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोग आणि मधुमेहाने ग्रस्त होते. कर्करोग बळावल्याने त्यांना एक महिन्यापूर्वी वारजे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आहे.
मुंबईतील कांदिवलीतील एका भाड्याच्या घरात ते वास्तव्यास होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. उपचारासाठी पैसेदेखील नव्हते. त्या वेळी विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. दूरचित्रवाहिनीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचे दर्शन नुकतेच प्रेक्षकांना घडले होते.
वढावकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ‘यस बॉस’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.
वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी ‘बुटपॉलिश’ करणाऱ्या पोराची भूमिका अजरामर केली होती. मराठी व्यावसायिक नाट्यनिर्माता संघातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.