मुंबई : दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे. रजनीकांतबरोबर या चित्रपटामध्ये राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये कामगारांच्या समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे.
कबाली हा चित्रपट एका गँगस्टरच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यामध्ये रजनीकांतनं डॉन कबलीस्वरन म्हणजेच कबालीची भूमिका केली आहे. राधिका आपटे रजनीकांतची पत्नी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच रजनीकांत लोकांना कशी मदत करतो, हे दाखवण्यात आलं आहे. ही मदत करताना त्याला याची किंमत मोजावी लागते.
मलेशियामध्ये तामिळ कामगारांवर अन्याय केला जातो आणि त्यांच्याच देशात त्यांना गद्दाराची उपमा दिली जाते. या कामगारांसाठी कबाली आवाज उठवतो. या चित्रपटातून मलेशियातल्या तामिळ कामगारांची दुर्दशा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बायको रुपा म्हणजेच राधिका आपटेबरोबर कबालीचं आयुष्य मजेत सुरु असतं, पण त्यानंतर अशी घटना घडते ज्यामुळे कबालीला 25 वर्ष जेलमध्ये जावं लागतं.
जबरदस्त डायलॉग आणि तूफान अॅक्शन सीन्स असलेला हा सिनेमा रजनीच्या फॅन्ससाठी पैसा वसूल ठरू शकतो. रोमॅन्टिक असो किंवा गँगस्टर रजनीनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे.
या चित्रपटाचं बहुतेक शूटिंग मलेशियामध्ये करण्यात आलं आहे. मलेशियातली सुंदर लोकेशन्स आणि सिनेमॅटोग्राफीही उत्तम करण्यात आली आहे. काही ठिकाणी चित्रपट थोडा स्लो वाटू शकतो, पण पहिला भाग हा अधिक चांगला आणि जलद आहे. चित्रपट आणखी थोडा छोटा झाला असता, तरी चाललं असतं असं काही वेळा वाटतं.
रजनीच्या फॅन्ससाठी हा चित्रपट म्हणजे एक ट्रीटच म्हणावी लागेल. रजनीकांतचे टिपीकल मूव्हस, अॅक्शन सीन आणि दमदार डायलॉग तुम्हाला नक्कीच आवडतील.