नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले, असा आरोप करत, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली आहे.
न्यायमूर्ती जगदीश सिंह केहर यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली आहे. सलमान खान आणि त्याच्या परिवारावर लावलेले हे आरोप तथ्यहीन आहेत असं या खंडपीठानं म्हंटलं आहे.
वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. हिट अँड रन प्रकरणी सलमानच्या बाजूनं निर्णय यावा यासाठी आम्ही 25 कोटी रुपये खर्च केले, असं सलमानचे वडिल सलीम खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
याचाच आधार घेत ही याचिका दाखल करण्यात आली होती. सलीम खान यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
पण सलमाननं 25 कोटी रुपये वकिलांच्या फी वर खर्च केले, असं म्हणत खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली.