www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले आणि इंदूरहून अटक झालेल्या आसाराम बापूंना घेऊन पोलीस जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास इंदूरहून ते विमानानं दिल्लीत पोहोचले. तिथं दोन तास थांबल्यानंतर दुसऱ्या विमानानं आसाराम बापूंना घेऊन पोलीस जोधपूरला पोहोचले.
जोधपूरला आता पोलीस आसाराम बापूंना कोर्टात हजर करतील. दरम्यान, जोधपूरमध्ये आसाराम बापूंच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केलीय. त्यांच्याकडून गोंधळाची शक्यता असल्यानं पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. शिघ्र कृती दलाच्या चार तुकडच्या तिथं तैनात करण्यात आल्या आहेत.
आसाराम यांचा जोधपूरमधील आश्रम रिकामा करण्यात आला आहे. जोधपूरमध्ये येणाऱ्या आसाराम यांच्या समर्थकांना शहराच्या बाहेरच अडवण्यात येतंय. दरम्यान, काल इंदूरमध्ये आसाराम समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला होता.
आसाराम यांच्या अटकेसाठी शाहजहांपूरमध्ये उपोषणावर बसलेल्या पीडित तरुणीच्या वडिलांनी आसाराम यांना अटक झाल्यानंतर अखेर उपोषण सोडलं. शनिवार सकाळपासून ते उपोषणाला बसले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.