'खेडूत बायका आकर्षित नसतात म्हणून पडतात...'

‘आरक्षणाचा फायदा फक्त बड्या घरांतील मुली आणि महिलांनाच मिळू शकेल... लक्षात ठेवा... तुम्हाला ही संधी मिळणारच नाही... कारण आपल्या खेड्यांकडील बायका इतक्या आकर्षित नसतातच त्यामुळे त्या निवडणुकीत पडतात’

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 10, 2012, 12:07 PM IST

www.24taas.com, बाराबंकी
‘आरक्षणाचा फायदा फक्त बड्या घरांतील मुली आणि महिलांनाच मिळू शकेल... लक्षात ठेवा... तुम्हाला ही संधी मिळणारच नाही... कारण आपल्या खेड्यांकडील बायका इतक्या आकर्षित नसतातच त्यामुळे त्या निवडणुकीत पडतात’ असं वक्तव्य करून मुलायमसिंह यादव मोठ्या पेचात अडकलेत.
महिला आरक्षणाचा फायदा हा फक्त शहरी आणि बड्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे, असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांना म्हणायचंय. हे सांगताना ते म्हणतात... ‘ग्रामीण भागातील महिला या आकर्षक आणि सुंदर नसतात, त्यामुळे त्या निवडणुकीत पडतात... म्हणून, महिला आरक्षणाचा लाभ त्यांना मिळूच शकत नाही.’ मुलायमसिंह यांनी आपला आणि आपल्या पक्षाचा महिला आरक्षणाला आपला ठाम विरोध असल्याचं म्हटलंय. सध्या ते लखनऊमधल्या बारबंकीमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. गुरुवारी बाराबंकीमध्ये झालेल्या रॅलीमध्ये मुलायमसिंग यांनी हे वक्तव्य केलंय. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणा मांडलेला प्रस्तावच चुकीचा आहे, हे त्यांनी अनेकदा पटवून देण्याचा फोल प्रयत्नही केलेला आहे. समाजवादी पार्टीच्या या विरोधामुळे महिला आरक्षण विधेयकही संसदेत आजपर्यंत पडून आहे. ‘महिला विधेयक जरी संमत झालं तरी या विधेयकाचा फायदा केवळ बड्या आणि राजकारण्यांच्या घरांतील महिला त्याचा फायदा घेतील आणि गरीब घरच्या बायका केवळ पाहत राहतील’ असं मुलायमसिंह यांनी म्हटलंय.
मुलायम यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होतेय. ‘महिला या वस्तू नाहीत तर राजकारण आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे हे मुलायम यांनी लक्षात घ्यावं’ अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी दिलीय. टीकेला सुरुवात झाल्यानंतर मात्र मुलायमसिंह यांनी एक पाऊल मागे घेत ‘आकर्षणाच्या बाबतीत माझं म्हणणं शारीरिक सुंदरतेशी नव्हतं तर एक राजकारणी म्हणून आकर्षण कमी असतं असं मला म्हणायचं होतं’ असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.