बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी

नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली. 

Updated: Mar 6, 2015, 02:27 PM IST
बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी title=

दीमापूर / नवी दिल्ली : नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या आरोपीवर एका आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगातही टाकलं होतं. परंतु, यानंतरही लोकांचा राग क्षमला नाही. हजारो लोक दुपारी दीमापूर सेंट्रल जेलवर चाल करून गेले. प्रचंड रागात असलेल्या या घोळक्यानं आरोपीला जेलमधून बाहेर काढलं... आणि मरेपर्यंत मारहाण केली. जवळपास साडे सात किलोमीटरपर्यंत त्याला खेचत, मारहाण करत आणलं गेलं. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी या आरोपीला जवळच्याच रस्त्यावरच्या एका चौकात फासावर टांगलं. 

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात काही लोक जखमीही झालेत. जेलची सुरक्षा सीआरपीएफच्या गार्डसवर सोपवण्यात आलेली होती. परंतु, तेदेखील या जमावाच्या रागापासून वाचू शकले नाहीत.  

२३ फेब्रुवारी रोजी आदिवासी मुलीवर फरीद खाननं बलात्कार केला होता. ३५ वर्षीय फरीद हा मूळचा बांग्लादेशी नागरिक होता. तो सेकंड हॅन्ड कार डीलर होता.  

पीडित मुलगी दीमापूरच्या एका कॉलेजची विद्यार्थीनी होती. बलात्काराच्या घटनेनंतर स्टुडंट फेडरेशननं पीडित मुलीच्या समर्थनार्थ आंदोलनं आणि निदर्शनं केली होती. हळू हळू हे प्रदर्शन धारदार होत गेलं आणि त्यानंतर याचंच भयानक रुपांतर समोर आलं.

या घटनेनंतर या भागातील परिस्त्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं नागालँड फोर्स तैनात केलीय. तसंच दीमापूरच्या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. या भागात १४४ वं कलम लावण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.