मुंबई : प्रेम व्यक्त कसं करायचं?,कुठे करायचं?, चारचौघात प्रेम व्यक्त करताना नक्की अश्लीलता काय?, या सगळ्या प्रश्नांवर आतापर्यंत बरीच चर्चा झाली. पण त्याला उत्तर मात्र मिळालेलं नाही.
आता पुन्हा 'किस ऑफ लव्ह'च्या निमित्तानं ही चर्चा तर होणारच. 'किस ऑफ लव्ह'ची गोष्ट सुरू झाली ती कोच्चीमधल्या एका प्रसंगातून, तिथल्या एका कॅफेमध्ये बसलेल्या कपलनं एकमेकांना किस केलं, आणि त्याविरोधात राजकीय संघटनांनी कॅफेची तोडफोड केली.
मग राजकीय संघटनांच्या या 'सो कॉल्ड' मॉरल पोलिसिंगला विरोध करत कोच्चीमधल्या एका कॉलेजमध्ये किस डे आयोजित करण्यात आला. त्याच्या पन्नास आयोजकांना पोलिसांनी अटक केली.
कोच्चीतलं हे किस ऑफ लव्ह प्रकरण मुंबईपर्यंत पोहोचलं आणि मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीही किस आंदोलन करत या अटकेचा निषेध केला.
'किस ऑफ लव्ह' हे फक्त एक निमित्त किंवा एक घटना आहे. पण यानिमित्तानं सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याचं नक्की काय करायचं. हा पारंपारिक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.
एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी घाऊक प्रमाणात किस करायचा की नाही, याबद्दल आक्षेप आणि वाद असू शकतात. पण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कपलनं किस केलाच तर त्यांना विरोध करण्याचा हक्क खरंच इतरांना आहे का.
याचा विचार व्हायला हवा. अश्लीलतेचा टॅग चिकटवला की मॉरल पोलिसिंगचे अधिकार मिळत असतील, तर अश्लीलता म्हणजे काय याची व्याख्या व्हायलाच हवी. पण दुर्दैवानं आजपर्यंत कायद्यालाही ती सापडलेली नाही.
आजच्या तरुणाईचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन ओपन माइंडेड आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाची संस्कृती लक्षात घेता असे प्रकार चारचौघात सर्रास होऊ नयेत, याचं भान त्यांनाही आहे. पण प्रेम करणा-यांसाठी हक्काची जागा हवी, या मागणीवर ते ठाम आहेत.
परदेशांमध्ये किस ऑफ लव्ह हे प्रकार सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी चालतात.'किस ऑफ लव्ह' हे जर अश्लीलतेच्या चौकटीत येत असतील, तर ९० टक्के बॉलिवूड सिनेमांमध्ये किसिंगला सेन्सॉर बोर्ड परवानगी कसं देतं.
जेव्हा सिनेमात किसिंग सीन दाखवला जातो, तेव्हा संस्कृती रक्षक म्हणवणारे तो सीन बघताना डोळे मिटून घेतात का. सुरुवातीला व्हॅलंटाईन डेला असाच विरोध झाला.
पण आज सगळ्यांनीच व्हॅलंटाईन डे स्वीकारला. मग या किस ऑफ लव्हचं पुढच्या काही वर्षांनी असंच होईल का? मुंबईसारख्या शहरांचा विचार केला, तर खोली दीड खोलीच्या खुराड्यात राहणा-या अगदी लग्न झालेल्या कपल्सनाही प्रायव्हसी मिळत नाही.मग ते हक्काचं ठिकाण कुठून शोधणार, याचा विचार व्हायलाच हवा.
या सगळ्याचं लॉजिक मांडलं की शेवटी मात्र पाडगावकरांच्या ओळीच निष्कर्ष काढण्यासाठी मदतीला येतात. तिनं प्रेम केलं, किंवा त्यानं प्रेम केलं.मला सांगा तुमचं काय गेलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.