नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकार आता एलईडी बल्ब्सची विक्री ऑनलाईनही करणार आहे. 'डोमेस्टिक एफिशियंट लायटिंग प्रोग्राम' म्हणजेच डीईएलपी या योजनेअंतर्गत सरकारने स्नॅपडील या कंपनीशी एक करार केला आहे.
देशातील ऊर्जेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेता सरकार गेले काही महिने एलईडी बल्ब वापरासंबंधी प्रचार करत आहे. सप्टेंबर महिन्यात एक बल्ब ४४ रुपये दराने विकण्याची योजनाही सरकारने सुरू केली होती. एलईडी बल्बच्या वापराने ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होते.
स्नॅपडीलसोबत केलेल्या करारानुसार सरकार ५,००० शहरांमध्ये हे बल्ब वितरीत करू शकणार आहे.
एका अनुमानानुसार सरकारने आत्तापर्यंत ५.६ कोटी एलईडी बल्बचे वितरण केले आहे. यामुळे दिवसाला १७३५ मेगावॅट विजेची बचत होण्यास मदत होत आहे. यामुळे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होण्यासही मदत होत आहे.
देशातील जास्तीत जास्त बल्बच्या जागी एलईडी बल्ब आणण्याची सरकारची योजना आहे. यामुळे भविष्यात विजेची आणि भांडवलाची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे.