मुंबई : स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला आपल्या सख्या बहिणीच्या - शीखा वोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलीय.
अधिक वाचा - हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक
विवाहाआधी 'एचआर'मध्ये होती इंद्राणी
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी असलेली इंद्राणी ही लग्नाअगोदर 'स्टार इंडिया'मध्ये एचआर कन्सल्टंट म्हणून काम पाहत होती. आपल्या बॉसच्या प्रेमात पडलेल्या इंद्राणीनं आपल्याहून वयांनी मोठ्या असलेल्या पीटर मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला.
पीटर मुखर्जी यांचं हे दुसरं लग्न होतं. पीटर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
इंद्राणी बनली 9X चॅनलची सीईओ
पीटर यांच्याशी विवाहानंतर इंद्राणीचा भाग्योदयच झाला. इंद्राणी आणि पीटर यांनी मिळून २००७ साली 9X चॅनल सुरू केलं. या कंपनीमध्ये पीटर यांनी इंद्राणीला सीईओ पदावर बसवलं. आणि त्यांनी स्वत: चेअरमनपदाची धुरा सांभाळली.
हे चॅनल INX मीडिया आणि INX न्यूजला एकत्र करून सुरु करण्यात आलं होतं. मात्र, २००९ साली इंद्राणी आणि पीटर यांनी दोघांनीही या चॅनलला रामराम ठोकला.
२००८ साली महिला उद्योगपती म्हणून गौरव
२००८ साली प्रसिद्ध 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं इंद्राणी हिला जगभरातील ५० महिला उद्योगपतींमध्ये ४१ व्या स्थानावर ठेवलं होतं.
हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप
पोलीस डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीवर भादंविच्या कलम ३०२ (हत्या) आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) नुसार आरोप ठेवण्यात आलेत.
संपत्तीच्या वादातून बहिणीची हत्या?
इंद्राणीनं आपल्या ड्रायव्हरसोबत मिळून संपत्तीच्या वादातून आपल्या बहिणीची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात आणखीही काही जणांना अटक होऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.