मुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य

मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 23, 2014, 05:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सांप्रदायिकतेच्या वादात आता आपच्या उमेदवार शाझिया इल्मी यांनी सुद्धा उडी घेतलीय. त्यांच्या जातीयवादी वक्तव्यावर आता सर्व ठिकाणांवरून टीका सुरू आहे. मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
शाझिया इल्मी असं वक्तव्य करत असलेला व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईट्सवरून प्रसिद्ध होत असल्यानं आप समोरील अडचणी वाढल्या आहेत. इल्मी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांसह आपच्या नेत्यांनीही टीका केली आहे.
या व्हिडिओमध्ये शाझिया इल्मी काही मुस्लिम युवकांशी बोलतानाची बातचीत रेकॉर्ड करण्यात आली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या आहेत, ``माझं मुस्लिमांना सांगणं आहे, की त्यांनी जास्त धर्मनिरपेक्ष बनू नये. त्यांना स्वतःच्या भल्यासाठी जातीयवादी बनावं लागेल. मला माहिती आहे, की हे वादग्रस्त वक्तव्य आहे. पण, सध्या हे गरजेचंही आहे. अरविंद केजरीवाल हे तुमचे आहेत. धर्मनिरपेक्षपणा मुस्लिमांसाठी खूप झाला. आपलं नुकसान करणाऱ्यांना तुम्ही आतापर्यंत निवडून देत आहात. त्यामुळं आता तुम्ही तुमच्या घराकडे बघून जातीयवादी बनलं पाहिजे.``

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.