अपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 3, 2014, 06:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.
`मुंडे यांचं यकृत फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर शरीरांतर्गत रक्तस्त्राव झाला होता. अपघातात जबर धक्का बसल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. मात्र मुंडे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरावी अशी एकही खोल जखम त्यांच्या अंगाच्या बाह्य भागावर झाली नव्हती`, असं डॉक्टरांच्या अहवालात म्हटलं आहे.
`एम्स`मधील डॉक्टरांच्या एका पथकानं मुंडे यांच्या शरीराचं पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम झाल्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आलं होतं. दुपारी १२.४० वाजता लष्कराच्या ट्रकमध्ये बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मुंडे यांचे कुटुंबीय `एम्स`मधून विमानतळाकडे रवाना झाले होते. एका एम्बुलन्समध्ये मुंडे यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं.
मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना तातडीनं एम्समध्ये आणण्यात आलं. इथल्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असताना त्यांचा नियमित श्वासोच्छवास बंद होता. शिवाय रक्तदाबही बंद झाला होता. डॉक्टरांनी तब्बल अर्धा तास मुंडे यांना वाचवण्याचे शर्थीनं प्रयत्न केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर ७.२० मिनिटांनी मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.