www.24taas.com,झी मीडिया, वाराणसी
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली असून जे मैदान सभेसाठी मागितलं होतं ते रिकामं नसल्याचं कारण देण्यात आलंय. मोदी यांच्या उमेदवारीमुळं काशीला सध्या युद्धभूमीचं स्वरुप आलंय. सर्व मोदीविरोधक वाराणसीत एकवटल्यानं देशाचं लक्ष या लढतीकडं लागलंय.
याच पार्श्वभूमिवर वाराणसीच्या बेनियाबाग मैदानावरील सभेनं प्रचारात आणखीच रंगत आणण्याचं भाजपनं ठरवलं होतं. मात्र या सभेला मैदान नाकारण्यात आल्यानं आयत्यावेळी सभेसाठी नवी जागा शोधण्याचं आव्हान भाजपपुढं उभं राहिलंय.
बेनियाबाग मैदान आधीच बुक झालेलं आहे. त्यामुळं त्याठिकाणी गुरुवारी अन्य कोणत्याही सभेला परवानगी देता येणार नाही, असं जिल्हा प्रशासनानं भाजपला कळवलंय. दरम्यान, ही परवानगी नाकारण्यामागं सुरक्षा हेही एक कारण असल्याचं सांगण्यात आलंय. भाजपनं मात्र या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना हे समाजवादी पक्षाचं कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.