www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भल्यामोठ्या टार्गेटनंतरही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. मात्र, पाचव्या दिवशी अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळेच रंगतदार झालेली वाँडरर्स टेस्ट अवघ्या आठ रन्सने ड्रॉ झाली. ज्या भारतीय बॉलर्सनी टेस्ट ड्रॉ केली, त्यांच्यामुळेच विजयही दृष्टीपथात आल्याची कबुली कॅप्टन धोनीने दिली.
जोहान्सबर्ग टेस्टचा अखेरचा दिवस हा अतिशय नाट्यमय ठरला. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं कधी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने तर कधी भारताच्या बाजुने झुकताना पाहायला मिळालं. मतमोजणीत जसं प्रत्येक राऊंडनंतर कोणता उमेदवार आघाडी घेईल? याची शास्वती नसते. तसंच चित्र दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत पहिल्या टेस्ट दरम्यान होतं. या सर्व घडामोडींचे प्रमुख सूत्रधार ठरले ते भारतीय बॉलर्स आणि याची कबूली दुसरी कोणी नाही तर स्वत: कॅप्टन धोनीनेच दिली आहे.
‘आमच्या बॉलर्सच्या अतिआक्रमकपणामुळे आमच्यावर पराभवाची स्थिती ओढवली होती. या टेस्टमधून आमच्या बॉलर्सना खूप काही शिकायला मिळालं. मिडल ओव्हर्समध्ये आमचे बॉलर्स जरा जास्त आक्रमक झाले होते’ असं कॅप्टन कूलनं म्हटलंय. बॉलर्सच्या अतिआक्रमपणावर जरी धोनीने टीका केली असली तरी तो त्यांच्या कामगिरीवर मात्र बेहद्द खूष आहे. फास्ट बॉलर्सनी वन-डेनंतर टेस्टमध्ये केलेली कामगिरी ही निश्चितच कौतुकास्पद असल्याचं मत धोनीने व्यक्त केलं आहे.
‘वन-डे खेळल्याने आम्हाला येथील पीचची थोडी माहिती झाली आहे. अशा परिस्थितीत आमच्या बॉलर्सची झालेली कामगिरी ही चांगलीच म्हणायला हवी. फास्ट बॉलर्स आमच्या कसोटीवर खरे उतरले असून, झहीरचंही विशेष कौतुक करायला हवं’ असं धोनीनं म्हटलंय.
दक्षिण आफ्रिका आफ्रिकेच्या वेगवान पीचेसवर अनुभवी झहीर खानचं टीममध्ये झालेलं कमबॅक हे टीम इंडियासाठी फायदेशीरच ठरलं. पहिल्या इनिंगमध्ये झहीरने केलेल्या टिच्चून बॉलिंगमुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग झटपट गुंडाळण्यात यश आलं. २६ डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्टला सुरूवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारतीय बॉलर्सनी पुरशी विश्रांती घ्यायला हवी. जेणेकरून अखेरच्या टेस्टमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्ध उरली सुरली कसर भरून काढेल आणि कॅप्टन धोनीनेही खूप काही सिद्ध करून दाखवायचं आहे, असं सांगत आतापासूनच कंबर कसून मेहनत करायला सुरूवात केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.