जयवंत पाटील झी मीडिया, मुंबई : मुंबईतील महालक्ष्मीत तेव्हाचं मराठी न्यूज चॅनेल, 'स्टार माझा'च्या न्यूज रूममध्ये रात्रीचे साठेआठ-नऊ झाले असतील. मी आपल्या नेहमीच्या ब्रेकिंग-फ्लॅशच्या डेस्कवर होतो. अचानक कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफेत गोळीबार झाल्याची बातमी आली. गोळीबार झाला एवढीच सुरूवातीला ती बातमी होती, सुरूवातीला हे गँगवार वाटत होतं, त्यानंतर विले पार्लेत एका टॅक्सीचा स्फोट झाल्याची दुसरी बातमी आली. यानंतर सीएसटी स्थानकाजवळही गोळीबार झाल्याची तिसरी बातमी आली, आणि मग काहीतरी भीषण प्रकरण असल्याची चर्चा न्यूज रूममध्ये सुरू झाली.
रात्री नऊची वेळ असल्याने न्यूज रूममध्ये रिपोर्टर नव्हते, कॅमरामनही नव्हता. मला कॅमेरा येतो, हे संपादक राजीव खांडेकरांना माहित होतं. पण अशावेळी ब्रेकिंग डेस्कची जबाबदारी अधिकच वाढली.
मात्र आमचा सहकारी नवनाथ सकुंडे मला म्हणाला, तू जा, पण काळजी घे, मी सांभाळतो, चिंता करू नकोस, असं म्हणून त्याने ब्रेकिंगची जबाबदारी घेतली, ती पुढील तीन दिवसांसाठी होती, याची कल्पना त्याला आणि मलाही नव्हती. आमचे एक सहकारी मंदार पुरकरांना वाटलं हे बाहेर गँगवार असेल, म्हणून ते मला गेट बाहेर येऊन हसत म्हणाले होते, जास्त पुढे जाऊ नकोस, पत्रकारांना शौर्य पुरस्कार मिळत नाहीत.
यावेळी कॅमेरा आणि रिपोर्टिंग मला एकट्यालाच करायचं होतं, मी रिपोर्टर-कॅमेरामन आणि ड्रायव्हर असे दोन्हीच निघालो. इतक्यात मध्येचं प्रणाली कापसेला निरोप दिल्याने, प्रणालीही बरोबर आली. सुरूवातीला आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलसमोर अॅम्ब्युलन्सच्या रांगा होत्या, एक एक जखमी व्यक्तीला आणलं जात होतं, अनेकांवर तर गाडीतच प्रथमोपचार होत होते.
ग्रॅनाईडचा हादरवणारा आवाज झाला, हा आवाज एवढा प्रचंड मोठा आणि हादरवणारा होता की, 'माझा नातेवाईक आहे, मला हॉस्पिटलच्या आत जाऊ द्या', असं म्हणत ज्यांनी हॉस्पिटलच्या गेटबाहेर गर्दी केली होती, ते सर्व नातेवाईकही गेटसमोरून पळून गेले असं वाटत होतं, दहशतवादी आपल्याच मागे गोळीबार करतायत.
नंतर समजलं, कामा हॉस्पिटलजवळ ग्रॅनाईडचा आणि एके-४७ ने फायरिंग सुरू आहे. हा आवाज त्याच वेळेसचा होता, जेव्हा आपले काही शूर पोलिस अधिकारी हुतात्मा झाले. यानंतर आम्ही आमची गाडी मेट्रो सिनेमाच्या दिशेने वळवली. मात्र मेट्रो सिनेमाच्या चौकात अचानक ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली आणि सांगितलं, "देखो पुलिस गाडी बहोत तेजी से आ रही है."
जी पोलिस गाडी आम्हाला क्रॉस करत काही मीटरवरून गेली, त्या पोलिस गाडीचं दोन दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्यातून निघालेली एक गोळी तेव्हा ई-टीव्हीच्या कॅमेरामनच्या हाताला लागली होती. दहशतवाद्यांनी अपहरण केलेली ही पोलिस गाडी मेट्रो सिनेमाच्या चौकातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने गेली होती.
मात्र यापूर्वीच या गाडीतील पोलिस अधिकाऱ्यांवर जेव्हा या दहशतवाद्यांनी फायरिंग केलं होतं, तेव्हा या गाडीच्या टायरलाही गोळी लागली, त्यामुळे दहशतवाद्यांनी अपहरण केलेली ही गाडी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी एका खासगी स्कोडा गाडीचं अपहरण केलं आणि तिच्यातून ते मुंबईच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं.
तितक्यात एक फोन आला, गिरगाव चौपाटीजवळ एका दहशतवाद्याला पोलिसांनी पकडलंय, आम्ही आड मार्गोने गाडी गिरगाव चौपाटीच्या दिशेने काढली. तेव्हा मुंबईच्या कधीही न झोपणाऱ्या गजबजलेल्या लहान-मोठ्या गल्ल्या, तशा त्या दिवशीही झोपलेल्या नव्हत्या, पण शांत दिसत होत्या, रस्त्यावर होते फक्त भुंकणारे भटके कुत्रे, त्यांनीही मुंबईच्या रस्त्यांवर अशी शांतता कधीच पाहिली नसेल.
गिरगाव चौपाटीला पोहचण्यासाठी आमच्या गाडीसमोर एका पीआयने जवळ येऊन पिस्तुल आमच्यावर रोखला होता. काय झालं? असं बोलल्यावर त्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं, पोलिस दिसल्यावर खिडकीतून हात उंच करा, नाहीतर काहीही होईल...
गिरगाव चौपाटीला पोहोचल्यावर पोलिस आणि दहतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, एक पोलीस शहीद झाल्याचंही सांगण्यात आलं, त्याचं नाव तुकाराम ओंबळे असल्याचं काही वेळाने समजलं. एका दहशतवाद्याचा पोलिसांनी या चकमकीत वेध घेतला होता, तर कसाबला याच ठिकाणी पोलिसांनी जिवंत पकडलं होतं.
या दरम्यान, घटनेचे व्हिज्य़ुएल्स देणे, लाईव्ह फोन सुरूच होतं, मुंबई झोपली नव्हती, तर अख्खी मुंबई टेलिव्हिजनसमोर बसली होती. तेव्हा इंटरनेट युगाची कुठे सुरूवात झाली होती.
यानंतर पुन्हा जीटी हॉस्पिटलकडे वळलो, कारण आत फायरिंग झाल्याचं सांगण्यात आलं, हॉस्पिटलच्या आत जाण्याचं कुणाचं धाडसं होत नव्हतं, सर्व बाजूला शस्त्रास्त्र घेऊन पोलिस दिसत होते, त्यांचे अनेक चांगले साथीदार गेल्याचंही ते सांगत होते. नेहमीच टिकेचे धनी ठरलेले पोलिस तेव्हा कर्तव्यदक्ष दिसत होते, मुंबईसाठी प्राण देत होते. हे मुंबई पोलिसांचं खरं रूप आणि योगदानही न विसरता येणारं होतं.
या दरम्यान जीटी हॉस्पिटलसमोर आर्मीच्या पोषाख असलेले जवान पोहोचले, त्यांचे कमाडिंग ऑफिसर एवढ्या दहशतीतही छाती पुढे काढून हॉस्पिटलमध्ये घुसले, आर्मीच्या जवानांनी रस्त्यावर शिस्तीत मार्च केला, आणि दहशतीची भीती पत्रकारांच्याही मनातून गेली.
यानंतर ताज हॉटेलकडे काय घडलंय, हे पाहण्यासाठी आम्ही गेलो, तेव्हा ताजच्या गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या खिडक्यांमधून आग दिसत होती. ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांची चकमक सुरू होती, ग्रँनाईड टाकण्याचे आवाज येत होते, तरीही अग्निशमन दलाचे जवान बाहेरून शिडी लावून, काचा फो़डून परदेशी पर्यटक तसेच हॉटेलातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढत होते.
जेव्हा ताजमध्ये चकमक सुर होती आणि ताजच्या मागच्या बाजूने पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, पायात चप्पल-बूट शिवाय हे पर्यटक रिगल सिनेमा पर्यंत रांगेत दबक्या पावलांनी चालत येत होते, त्यांचे पाय पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यांना लागले असतील असं वाटत होतं, रिगल सिनेमा बाहेरून लक्झरी बसेसने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत होतं, यात विविध देशातील पर्यटक दिसत होते.
पुन्हा आम्ही ताज हॉटेलपासून अवघ्या ५ ते १० मीटर अंतरावरजवळ आलो, आग विझवण्यात अग्निशमन दलाल यश येत होतं, यानंतर सकाळ झाल्यावर पुन्हा ऑफिसला पोहोचलो, तेव्हा दिल्लीतून विमानाने दाखल झालेले काही पत्रकार, हॉटेलपासून २०० ते ३०० मीटर अंतरावरून झोपूनच टीव्ही मीडियाला लाईव्ह देत होते, ही शोबाजी होती का गरज, हे अजूनही समजू शकलेलं नाही.
मात्र एका रात्रीत २६/११ च्या हल्ल्याचं रिपोर्टिंग मला मोठा अनुभव देणारं ठरलं, मुंबईचं एक अनोख रूप मला दिसलं, संकट कितीही मोठं असलं, तरी त्याचा सामना कसा करायचा, हे यातून शिकता आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.