www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट... एका नावासाठीची ही अनेक विशेषणं... पण त्यातलं सगळ्यात आवडतं आणि हक्काचं म्हणजे `साहेब`... सच्चा शिवसैनिक याच नावानं बाळासाहेबांना ओळखतो... या एका नावानं शिवसैनिकांना जगण्याची ऊर्जा दिली... ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि जगण्यासाठी लढायला शिकवलं...
बाळासाहेब आणि शिवसैनिक यांचं गेल्या पन्नास वर्षांपासून हे घट्ट नातं विणलं गेलंय. शिवसेनेचा जन्म झाला तो हा काळ... देशाला स्वातंत्र्य मिळून दहा वर्षं झाली होती... प्रत्येक राज्य अस्तित्वासाठी चाचपडत होतं... मुंबई स्वतःची ओळख शोधत होती... त्याचवेळी मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईत दक्षिणेकडच्या लोकांचं प्रमाण वाढू लागलं आणि स्थानिकांच्या पोटावर पाय पडू लागला... मराठी माणूस मरगळलेल्या आणि असंघटित अवस्थेत निमुटपणे अन्याय सोसत होता... बाळासाहेबांच्या मार्मिकमधून मराठी माणसाला या अन्यायाची प्रखरपणे जाणीव झाली आणि त्या जाणीवेचं मूर्त रुप होतं शिवसेना... त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचा तिरंगा आणि दुसऱ्या बाजूला डाव्यांचा लाल फडका यामध्ये गुंडाळलेला होता... त्याला भगवा करण्याचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दाखवला... शिवसेनेची निर्मिती करुन मराठी माणूस मराठी माणूस म्हणून विचार करु शकतो, हे चित्र महाराष्ट्राला दाखवलं. अस्तित्वासाठी चाचपडणाऱ्या मराठी माणसाला दिशा मिळाली, संघटना मिळाली, नेतृत्व मिळालं आणि हक्काचे साहेब मिळाले... साहेबांनी मराठी माणसाच्या कल्याणाचा विडा उचलताच साहेबांना साथ देणारे लाखो मावळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धावून आले... आंदोलनांना जोर चढला, गिरणी कामगार, स्थानिक मुंबईकर पेटून उठला. साहेबांच्या एका शब्दावर मुंबई बंद पडायला लागली... शिवसैनिकांसाठी आदेश हा फक्त साहेबांचाच... इतर कुठलीही शासन यंत्रणा शिवसैनिकांच्या निष्ठेपुढे आणि निर्धारापुढे टिकू शकली नाही... साहेबांचा शब्द हाच इमान मानणारे तब्बल ५२ शिवसैनिक मोरारजी देसाईंच्या काळात चिघळलेल्या सीमाप्रश्नाच्या आंदोलनात शहीद झाले. त्या शहीद शिवसैनिकांना खांदा द्यायला स्वतः बाळासाहेब गेले. वसंतराव नाईकांच्या काळात बाळासाहेबांना अटक झाली आणि शिवसैनिकांनी मुंबईत जे रान पेटवलं, त्यापुढे सरकारचीच बोबडी वळली. शेवटी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांततेचं आवाहन करा, असं बाळासाहेबांना सांगण्याची नामुष्की सरकारवर आली. नंतर बाळासाहेब संपूर्ण ताकदिनीशी राजकारणात उतरले. सत्ता हात जोडून नतमस्तक झालेली असतानाही बाळासाहेबांनी कधी राज्याभिषेक करुन घेतला नाही किंवा कुठल्या पदाची आशाही ठेवली नाही... ज्यावेळी सत्ता आली, त्यावेळी सत्ताधारी झाला तो शिवसैनिक... वेगवेगळी पदं वाटली गेली ती शिवसैनिकांना... मासे विकणारा, झाडू मारणारा तळागाळातून आलेला शिवसैनिक नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला... बाळासाहेबांना साथ देणारा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला... बाळासाहेबांनी साम्राज्य जिंकलं पण सत्ता मात्र कार्यकर्त्यांना वाटून टाकली. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांवर शिवसैनिकांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा... किंबहुना शिवसैनिकांचं बाळासाहेब हे दैवत झाले... यशाच्या शिखरावर असतानाही बाळासाहेब शिवसैनिकाला कधीच विसरले नाहीत... शिवसैनिकासाठी आधाराचा हातही होता आणि पाठीवरची प्रेमाची थापही होती. सभेत बोलतानाही माझा शिवसैनिक हा उल्लेख शेवटपर्यंत कायम राहिला... सभेवेळी शिवतीर्थ खचाखच भरलेलं असायचं, साहेबांची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी जमायची... साहेबांचं भाषण जीवाचे कान करुन ऐकणारा हा जमाव... यातल्या अनेकांचं राजकारणाशी देणंघेणंही नव्हतं... पण साहेब बोलणार म्हणून कामधाम सोडून शिवसैनिक शिवतीर्थावर जमायचा...
‘जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो’ हे शब्द ऐकताच शिवसैनिकांचं भान हरपून जायचं. त्या दैवताची शिवसैनिक अक्षरशः मानसपूजा करायचा. असं काय होतं या माणसात, याचं उत्तर शोधताना साहेब आणि शिवसैनिकांचं नातं किती घट्ट आणि किती उत्कट आहे, याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा यायचा.
बाळासाहेबांनी शिवसैनिकांना काय दिलं, याचं उत्तर शब्दांमध्ये देता येणार नाही कदाचित... पण साहेबांवरची शिवसैनिकांची सच्ची निष्ठाच त्याला पुढच्या लढाया लढायला ऊर्जा देईल. काहीही झालं तरी साहेबांनी त्यांचं हृदय शिवसैनिकांना दिलंय. म्हणूनच साहेब आजही प्रत्येक शिवसैनिकामध्ये जिवंत आहेत.