सुबल सरकार यांचे निधन

ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या चित्रभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी सिनेमा आणि नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे गेल्या चाळीस वर्षांचे अतूट असं नातं होतं.

Updated: Nov 12, 2011, 11:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या चित्रभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी सिनेमा आणि नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे गेल्या चाळीस वर्षांचे अतूट असं नातं होतं. मराठीतल्या जवळपास सर्वच आघाडीच्या कलाकारांनी सुबल सरकारांच्या हाताखालीच नृत्य दिग्दर्शनाचे धडे गिरवले. दादा कोंडके आणि उषा चव्हाणांच्या गाजलेल्या नृत्यांनी महाराष्ट्रात एक काळ धुमाकूळ घातला होता, त्याचे नृत्य दिग्दर्शन सरकार यांनीच केलं होतं. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार नऊ वेळा मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. केवळ मराठीच नव्हे तर अनेक प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं.

बांग्लादेशात जन्माला आलेले  सरकार महाराष्ट्रात आले आणि ते महाराष्टाचेच झाले. आपण कायम मराठी असल्याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला. मराठी माती, मराठी भाषा आणि मराठी सिनेमाशी ते एकरुप झाले. सरकार यांनी सचिन शंकर यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले आणि त्यांच्या नृत्यपथकात ते दाखल झाले. सरकार यांच्या निधनाने मराठी सिनेमातल्या एका लयबध्द पर्वाची अखेर झाली आहे असंच म्हणावं लागेल.