Western Railway TC Beaten: मुंबईमधल्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाला म्हणजेच टीसीला झालेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण माफी मागून मिटवण्यात आलं होतं. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना टीसीला मारहाण करणाऱ्याने बिनशर्थ माफी मागितली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता या प्रकरणामध्ये एक नवा ट्वीस्ट समोर आला असून बोरीवली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे या मारहाणीमध्ये टीसीच्या दाढीला हात लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत एकाने टीसीला मारहाण करणाऱ्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.
15 ऑगस्ट रोजी एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यावरुन काही प्रवाशांनी टीसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं होतं. मारहाण करणाऱ्या प्रवाशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची टीसीबरोबर बाचाबाची झाली आणि यातूनच प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याचं पश्चिम रेल्वेने अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन शेअर केलेल्या मारहाण करणाऱ्या प्रवाशाने लिहिलेल्या माफीनाम्याचा संदर्भ देत म्हटलं होतं. तसेच टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही कारवाई न करता का सोडून देण्यात आलं हे ही पश्चिम रेल्वेने सांगितलं होतं.
मात्र केवळ मारहाण करत टीसीचं शर्ट फाडून, त्याचा हात फ्रॅक्चर करण्यापर्यंतच हल्लेखोर थांबले नाहीत तर या टीसीने दंड म्हणून जमा केलेले दीड हजार लंपास करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाही पश्चिम रेल्वेने हे पैसे परत केले आणि माफी मागितली म्हणून मारहाण करणाऱ्यांना सोडून दिलेलं. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी टीसी जसबीर सिंग यांना मारहाण करणाऱ्या अनिकेत भोसलेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ये बुजुर्ग जगबीर सिंह जी है, TTE हैं रेलवे में, नौकरी के अपने आख़िरी चरण में हैं और ईमानदारी से रोज़ अपना काम करते हैं, लड़कों से टिकट माँगा, लड़कों के पास टिकट नहीं था तो चालान काटने लगे।
बाक़ी इतनी हिम्मत लड़कों की कैसे पड़ी ये समझने के लिए आपको TTE के कपड़े और हुलिया देखना… pic.twitter.com/6FcaoGRG3P
— Yasar Shah (@yasarshah_SP) August 17, 2024
दरम्यान, या मारहाण प्रकरणामध्ये शीख धर्मीय टीसीच्या दाढीला हात लावण्यात आल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. यावरुन हा शीख धर्मियांचा भावना दुखावण्याचा प्रकार असून मारहाण करणाऱ्याला घरात घुसून मारेन, अशी धमकी देणाऱ्या शीख तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विकी थॉमस सिंग असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने टीसीच्या दाढीला हात लावून शीख धर्मीयांच्या भावाना दुखावल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच आपण मारहाण करणाऱ्याला म्हणजेच अनिकेत भोसलेला घरात घुसून मारणार असल्याचं विकीने म्हटलं आहे.
"रेल्वे पोलिसांना विनंती आहे सदर टीसी हा सरकारी नोकरी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत होता. त्याच्या गळ्यामध्ये ओळपत्रही होतं. असं असताना गुंडगिरी होत असेल तर मी गुंडांचा 'गॉडफादर' आहे. मारहाण करणाऱ्याच्या घरात घुसून मी त्ला मारेन. आम्हाला बोट दाखवू नका, नाहीतर बोट देखील राहणार नाही. केवळ एफआयआरवर भागणार नाही. पुढील कारवाई थेट कोर्टात होईल. कायदा अस्तित्वात आहेच," असं विकी थॉमस सिंगने म्हटलं आहे.
विकी थॉमस सिंग हा सोशल मीडिया इन्फ्युएन्सर असून त्याचे सव्वा लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत.