Vegetable Price Hike : राज्यात कधी एकदा पाऊस हजेरी लावतो याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. बळीराजासुद्धा या नभांकडे पाहताना आस लावून बसला होता. अखेर पाऊस आला आणि सगळेजण सुखावले. पण, सध्या घरचा हिशोब हाताळणारी मंडळी मात्र काहीशी त्रस्त दिसत आहेत. कारण, दररोजच्या अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचेदर गगनाला भिडले आहेत. भाजी मंडईमध्ये दरांचा वाढीव आकडा पाहून अनेकजण रिकाम्या हातानंच परतीची वाट धरताना दिसत आहेत.
राज्यातील पावसामुळं एकिकडे उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार तमिकीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान झाल्यामुळं त्यांच्या बाजारभावांत लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर Wholesale Market मध्ये 50 ते 55 रुपये किलो असले तरीही भाजीवाल्यांकडे येईपर्यंत हे दर 80 ते 100 रुपे प्रती किलो इतक्या स्तरावर पोहोचल आहेत. फरसवी, घेवडा, मिरची, हिरवा वाटाणा (मटार) या भाज्यांचे दरही 30 - 40 रुपये पाव इतके झाल्याची माहिती मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतून समोर आलेल्या माहितीनुसार इथं दर सोमवारी साधारण 600 ट्रक भाजीपाला घेऊन दाखल होतात. पण, जून महिन्यातील अखेरच्या आठवड्याच्या सोमवारी मात्र 467 ट्रकच इथं दाखल झाले. त्यातही पावसामुळं किमान 10 ते 20 टक्के मालाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं या नासाडीची नुकसानभरपाई भाजीपाल्याच्या वाढीव दरातून आकारली जात आहे. टोमॅटो आणि मिरचीबाबत सांगावं तर, दर दुसऱ्या पदार्थामध्ये वापरली जाणारे हे जिन्नसही शंभरीपार पोहोचले आहेत. होलसेल बाजारात मिरचीचे जर 45 ते 55 रुपये किलो इतके आहेत. तर, किरकोळ बाजारात हेच दर 120 रुपये प्रती किलो इतका आकडा गाठत आहेत. त्यामुळं अनेकांच्याच जेवणातून तूर्तास टोमॅटो, मिरचीही गायब होताना दिसतेय.
भाज्या | होलसेलचे दर | किरकोळचे दर |
फरसबी | 50 ते 60 रुपये | 100 ते 120 रुपये |
भेंडी | 20 ते 30 रुपये | 60 ते 80 रुपये |
फ्लॉवर | 12 ते 15 रुपये | 50 ते 60 रुपये |
घेवडा | 35 ते 45 रुपये | 100 ते 120 रुपये |
काकडी | 15 ते 25 रुपये | 60 ते 70 रुपये |
शेवग्याची शेंग | 40 ते 45 रुपये | 80 ते 100 रुपये |
वाटाणा | 50 ते 70 रुपये | 100 ते 120 रुपये |
गवार | 40 ते 50 रुपये | 60 ते 80 रुपये |
वांगी | 24 ते 30 रुपये | 60 ते 70 रुपये |
पावसाळी वातावरणाचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसताना दिसत आहे. पालक, पातीचा कांदा, कोथिंबीर, मेथी, माथ आणि इतर पालेभाज्यांची नासाडी झाल्यामुळं त्यांचेही दर कडाडले असून, एका मेथीच्या जुडीसाठी 35 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. थोडक्यात पावसाळा सुरु झालेला असला तरीही त्यानं खिशाला फटका बसतोय हे नाकारता येत नाही.