लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्यावा! अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा

महिन्याला जेमतेम 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, घर चालवायचं की प्रवासावर खर्च करायचे - मुंबईकर

Updated: Jul 21, 2021, 04:53 PM IST
लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्यावा! अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा title=

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून बंदच आहे. यावर भाजपने राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन केलं जाईल अशा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या रेल्वे प्रवासाला 25 रुपये लागतात. पण रेल्वे बंद असल्याने त्याच प्रवासासाठी लोकांना 250 रुपयांहून अधिकचा खर्च करावा लागत आहे. डोंबिवली, ठाणे इथल्या लोकांना कामासाठी मुंबईत यायचं झालं तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. 700 ते 800 रुपये टॅक्सी किंवा खासगी वाहनांसाठी जात असून नाईलाजस्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. 

बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेऱ्यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी तातडीने निर्णय घेऊन ज्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. यावेळी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार अशा हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे. महिन्याला जेमतेम 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यांमुळे घर चालवायचं कसं? मुलांचे शिक्षण करायचे, की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून या संदर्भात परवानगी दिली गेली नाही तर भाजपच्या वतीने बोरिवली, दादर, सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.