मुंबई : कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे महत्त्वाचं असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. इटली, स्पेन, अमेरिकेमधील कोरोनाची तुलना करत नाही. परंतु आपण नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्री, पंतप्रधान वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. सर्वांना सूचना करत आहेत. सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं, नियमाचं सर्वांनी पालन करण्याचं जनतेला आवाहन करत पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.
कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणाला मोठा धोका होऊ शकतो. उद्योग बंद असल्याने बेरोजगारीचं संकट वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही सीएसआर देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. पिण्याचे पाणी कमी पडू नये, अन्नधान्य कमी पडू नये याची खबरदारी घेण्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.