दीपक भातुसे, मुंबई : सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका मांडण्यात पक्ष कमी पडल्याने पवारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
सीबीआय चौकशीस अनिल देशमुख सामोरे जातील तेव्हाही पक्ष पाठीशी राहील असे पवारांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीला जयंत पाटील, वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख हे नेते उपस्थित होते.
अनिल देशमुख प्रकरणात महाविकासआघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. राज्य सरकारकडून या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टान या याचिका नामंजूर करत राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांची आता सीबीआय चौकशी होणार आहे.
विरोधकांनी आधीपासून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र होतं.