मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Yojana) राज्य सरकारच्या समितीने क्लीन चिट दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचं स्पष्टीकरण राज्या सरकारने दिलं आहे.
यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे. चौकशी सुरु असताना कमळ कसं उगवलं? कोण तरी कारस्थान करतंय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे, यावरुन आपल्याला बिहारच्या चारा घोटाळ्याची आठवण झाली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने SIT नेमलेल होती. त्याप्रमाणे सुमारे 71 टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेलं आहे. SIT च्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेला नाही. ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्न येत नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट दिल्याचं वृत्त आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. जलयुक्त शिवार ही जनतेची योजना आहे, ही योजना कशी योग्य आहे याचा अहवाल उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीनेही दिला होता. तो अहवाल उच्च न्यायालयानेही स्विकारला होता. या योजनेबाबत काही तक्रारी असू शकतात, आणि त्याबाबत चौकशीही झाली पाहिजे, आतापर्यंत 6 लाख कामं झाली आहे, आणि त्यापैकी 600 कामांची चौकशी ही काही मोठी गोष्ट नाही असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.