राजीव रंजन सिंह, झी मीडिया, मुंबई : दिल्ली-मुंबई राजधानी ट्रेनमध्ये सध्या उंदिरमामांनी धुमाकूळ घातलाय. या उंदरांनी एका ६० वर्षांच्या प्रवाशाचा चावा घेतल्यानंतर त्यांना तीन तास साधे वैद्यकीय उपचारही उपलब्ध होऊ शकले नाहीत.
बृजभूषण सूद व्यवसायाच्या निमित्तानं दिल्ली मुंबई दरम्यान ते राजधानी ट्रेननं प्रवास करतात. पण गेल्या ७ जानेवारीची रात्र त्यांना कधीच विसरता येणार नाही. दिल्लीहून मुंबईला येताना रात्री १२ च्या दरम्यान भरधाव राजधानीमध्ये त्यांना उंदीर चावला.
रक्त वाहत असल्यानं त्यांनी नागदा स्टेशनवर त्याबाबतची तक्रार नोंदवली. टीसीकडंही त्यांनी मदत मागवली, मात्र मदत मिळाली ती तब्बल 3 तासानंतर. याबाबत त्यांनी आता रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांकडं तक्रार केलीय.
राजधानी म्हणजे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील महत्वाची रेल्वे. पण या घटनेमुळं पश्चिम रेल्वेच्या इभ्रतीला बट्टा लागलाय. मात्र संबंधित घटनेतील प्रवाशाला रेल्वेकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात आलं.
रात्री ३ वाजता बडोदा स्टेशनवर डॉक्टरांनी सूद यांची तपासणीही केली. मात्र उंदराने चावा घेतल्याचा उल्लेख डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नाही, असा दावा पश्चिम रेल्वेनं केलाय.
राजधानीच्या प्रवासासाठी जास्त भाडं भरूनही उंदरांसोबत प्रवास करावा लागत असेल तर ती पश्चिम रेल्वेसाठी नामुष्कीची बाब आहे. रेल्वेतील साफसफाई आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत रेल्वेनं अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.