मुंबई : मंगळवारी झालेल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आणि मुंबईची जीवनवाहिनी तातडीने ठप्प झाली. रेल्वे ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड असे हाल झाले. यात सगळ्यात दिसून आली रेल्वेची बेपर्वाई, प्रशासनाची मस्ती आणि तरीही मुंबईकरांची प्रचंड सहनशीलता...
मंगळवारी मुंबईची तुंबई झाली... मुंबईची जीवनवाहिनी २४ तासांपेक्षा अधिक काळ ठप्प पडली... रेल्वे रूळांवर साचलेल्या पाण्यातच लोकलगाड्यांची रांगच लागली... आणि यामुळे झाले मुंबईकरांचे झाले अभूतपूर्व हाल...
२०१७ या वर्षातल्या ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यातला मंगळवार हा मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील. जीवनवाहिनीवर अवलंबून असलेले तुफान पावसातही पर्वा न करता मुंबईच्या दिशेने निघाले खरे... पण पुढ्यात काय वाढून ठेवलंय? याची कल्पनाच त्यांना नव्हती. बदलापूर, टिटवाळा, कल्याण, डोंबिवलीतून निघालेले प्रवासी घाटकोपर, कुर्ल्यापर्यंत पोहोचले आणि अक्षरशः मुंबईतल्या एखाद्या बेटावर अडकल्यासारखी त्यांची स्थिती झाली. मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकांवर अक्षरशः लाखो प्रवासी अडकले. कित्येक तास रखडलेल्या गाड्यांमधून प्रवाशांनी ट्रॅकवर साचलेल्या पाण्यातून जवळच्या स्टेशनकडे चालायला सुरूवात केली.
मुंबई लोकलचं मुंबईकरांच्या आयुष्यातलं काय स्थान आहे, हे रेल्वे प्रशासनाला निश्चितच माहिती आहे. मात्र त्याचं गांभीर्य रेल्वेला अजिबातच नाही याचा नेहमीसारखा प्रत्यंतर परत मुंबईकरांना आला. रेल्वे स्थानकांवर कोणतीही उद्घोषणा नव्हती. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नव्हती. स्थानकांवर आसऱ्याला उभे असलेल्या प्रवाशांच्या डोक्यावर म्हणायला पत्रे होते पण तेही गळके... मुंबईत सध्या धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये मोटरमन प्रवाशांशी संवाद साधू शकेल अशी यंत्रणा बसवलेली आहे. मात्र या यंत्रणेतून अडकलेल्या प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नव्हती. सीएसटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे या स्थानकांवर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होती. कोणालाही कसलीही माहिती नव्हती.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे विशेष हाल झाले. ठाणे कल्याण ठाणे गाड्या काही वेळ चालवल्या जात होत्या. मात्र त्यानंतर तीही वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढतच गेली. रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वरून कोसळणारा पाऊस, अस्वच्छ, तुंबलेली टॉयलेट यामुळे अनेकांची कुचंबणा होत होती. मात्र याचं कोणतंही सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला नव्हतं. गाड्या कधी सुरू होणार आहेत? रिकाम्या गाड्या कारशेडकडे का वळवल्या जातायत? प्रवासी आज घरी पोहोचू शकणार आहेत का? रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांसाठी बेस्ट, एसटी यांची काही पर्यायी व्यवस्था झाली का? याची फिकीर ना रेल्वेला होती, ना सरकारला...
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसोबतच महाप्रचंड हाल झाले ते लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे... आधीच मंगळवारी सकाळी दुरांतो एक्स्प्रेस घसरल्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलले होते. त्यातच आता पावसामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. मात्र गाड्यांचं स्टेटस काय, गाड्या जाणार आहेत की नाहीत याची माहिती टर्मिनसवर दिली जात नव्हती. रेल्वे हेल्पलाईनला फोन केला असता तिथल्या कर्मचा-यांना तर गाड्यांच्या धड वेळाही माहिती नसल्याचं दिसून येत नव्हतं.
३०० ते ३५० मिमि पाऊस हा मोठा असला तरी मुंबईला काही तो नवीन नाही. मुंबईत पाऊस यावर्षी पहिल्यांदा पडलेला नाही. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी रेल्वेकडे आवश्यक तयारी असणं अपरिहार्यच आहे. मुंबईला मोठा पाऊस जसा नवा नाही तशी रेल्वेलाही मुंबई नवी नाही. १८५७ पासून मुंबईत रेल्वे धावतेय, म्हणजे जवळपास १६० वर्षे हा कारभार करूनही जर रेल्वेला इथल्या समस्या माहिती नसतील तर रेल्वे आणि तिचे कारभारी कसे आहेत हेच दिसून येतं. या हाल अपेष्टा सोसूनही मुंबईकरांनी दाखवलेल्या संयमाचं विशेष कौतुक करायला हवं. रेल्वेमंत्री सध्या राज्यातले आहेत, कोकणातले आहेत. मुंबईत विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची हजेरी पाहायला मिळते. तेव्हा रेल्वेमंत्री मोठमोठी आश्वासनंही देतात. मात्र आता केवळ आश्वासनं देण्याऐवजी ती पूर्ण करण्याकडेही रेल्वेमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे.