Crime News : मुंबईत शहरात अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून विशेष मोहिम राबवण्यात आली. याअनुषंगाने परिमंडळ 10 मधील अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीच्या गुन्हयांना आळा घालणे यासाठी पवई पोलीस स्थानकातील पथक कार्यकरीत असून त्यांनी एका कारवाई दरम्यान जवळपास 13 किलो 217 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आणि गावठी कट्टा यासह एकास अटक केली.
9 डिसेंबर रोजी पोउनि सरक हे त्यांच्या पथकासह पवई पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी चांदशहावली दर्गा कंपाउंडच्या बाजूला असलेल्या कब्रस्तान आणि विहार सरोवर जवळ एका राखाडी रंगाच्या मारूती अल्टो मोटार कारमध्ये मोहम्मद सादिक हनिफ सय्यद नावाचा आरोपी आढळून आला. सदर व्यक्ती हा अंमली पदार्थ विक्री करणारा असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यातून 6 किलो 32 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, 18.5 सेमी लोखंडी बॅरल आणि एक गावठी बनावटीचा कट्टा येथे आढळून आला. अंमली पदार्थ आणि गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केल्यावर सदर आरोपीची अजून सखोल चौकशी करण्यात आली.
सखोल चौकशीनंतर आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार चांदशहावली दर्जा कंपाउण्ड हवालदिल एका खोलीतून 7 किलो 185 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यावरून पवई पोलीस ठाणे गु.र.क्र 980/2024 कलम 8 (क) सह 20 (ब), 2 (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 सह कलम 3, 25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातून सुमारे 3,30,42,500 रुपयांचा 13 किलो 217 ग्रॅम वजनाचा वरस हा अंमली पदार्थ, 10,000 रुपयांचा एक गावठी कट्टा, सुमारे 4,00,000 रुपयांची मारूती अल्टो मोटार कार, 01 चिलीम आणि रोख 3410 रूपये असा एकूण 3,34,55,910 रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी मोहम्मद सादिक हनिफ सय्यद, वय 46 वर्ष यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीवर अंमली पदार्थ विक्रीचा 02 आणि अंमली पदार्थ सेवनाचा 01 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, (का व सु) सत्यनारायण अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजितसिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 चे गा. सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग प्रदिप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि प्रविण पवार (का व सु), सपोनि संतोष कांबळे (DO) पोउनि शोभराज सरक, पो हवा. उदय लांडगे, पो. हवा. सुभाष खंडागळे, पो शि राकेश अहिरे, पो शि केदार गायकवाड, पो शि निवृत्ती पवार यांनी केली आहे.