भाजप-शिवसेना पुन्हा आमने सामने, दहिसरमध्ये तणाव

भाजप आणि शिवसेनेत आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे

Updated: Apr 20, 2022, 05:26 PM IST
भाजप-शिवसेना पुन्हा आमने सामने, दहिसरमध्ये तणाव title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपतर्फे पोलखोल अभियानाची (Polkhol Abhiyan) सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईती प्रत्येक भागात, प्रत्येक गल्लीत जाऊन मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार व्हिडिओ स्वरुपात दाखवला जाणार आहे. 

चेंबुरमध्ये रथाची तोडफोड
काल चेंबुरमध्ये 'पोलखोल अभियाना'ची सुरुवात होणार होती. पण अज्ञात व्यक्तीने रथाची तोडफोड केली. ही तोडफोड युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत (ShivSena) वादाची ठिणगी पडली आहे. 

दहिसरमध्ये तणाव
वादाचा दुसरा अंक आज दहिसरमध्ये पाहिला मिळाला. दहिसरमध्ये भाजपच्या पोलखोल सभेवरून तणाव निर्माण झालाय. या सभेसाठी भाजप उभारत असलेल्या स्टेजला शिवसेनेनं जोरदार विरोध केला. दहिसर पश्चिमेकडे नवा गावमध्ये शगून हॉटेलसमोर हे स्टेज उभारलं जातं आहे. 

सभेसाठी परवानगी मिळाली आहे, मात्र व्यासपीठाला महापालिकेनं अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे कार्यकर्त्यांसह दाखल झाल्या आणि त्यांनी व्यासपीठाचं काम थांबवण्याची मागणी केली. भाजपच्या माजी नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव वाढला.