BMC Broken ED: नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष उलटूनही मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही. हे सरकार जाणिवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकतंय कारण त्यांना पालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात असतो. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी असून पालिकेची उलाढाल खूप मोठी आहे. त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान पालिकेच्या तिजोरी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आे. मुंबई महापालिकेने मागील 3 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महापालिकेने दिली आहे. यात बेस्टला अधिदान देण्यासाठी 6 वेळा मुदत ठेव मुदतपूर्व मोडली आहे. मागील 3 वर्षात मुंबई महापालिकेकडे मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती मागितली होती. पालिकेच्या उप प्रमुख लेखापाल ( महसूल 2) ने अनिल गलगली यांस 8 मुदत ठेव मुदत पूर्व तोडल्याची यादी दिली. 2360 कोटी 20 लाख 19 हजार रुपये अशी मोडलेल्या मुदत ठेवींची रक्कम आहे.
कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन धारकांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन / निवृत्ती वेतनाचे अधिदान गणेशोत्सव सणापूर्वी दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियातुन 29 ऑगस्ट 2022 रोजी 645,20,07,000 इतकी मुदत ठेव मोडल्याची माहिती आरटीआयमध्ये देण्यात आली आहे.
एमएमआरडीएला अधिदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात जमा असलेली 949,50,00,000 इतकी मुदत ठेव दिनांक 15 मार्च 2024 रोजी मोडल्याची माहिती समोर आली आहे.
2019 -20 च्या 19 ऑगस्ट 2019 रोजी 250 कोटी आणि 113 कोटी अशा 2 मुदत ठेवी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. 21 ऑगस्ट 2019 रोजी 115 कोटींची मुदत ठेव पुन्हा बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडली. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या. 2022-23 च्या 25 मार्च 2022 रोजी बेस्ट अधिदान करण्याकरिता एकाच दिवशी 3 मुदत ठेवी अनुक्रमे 100 कोटी, 92.06 कोटी आणि 87.06 कोटी बेस्ट अधिदान करण्याकरिता मोडल्या. सर्व मुदतठेवी ह्या स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.