मुंबई : देशात सध्य़ा ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधीच कंबर कसली आहे. मुंबईत विविध सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई आमदार सुद्धा सुटलेले नाहीत. त्यामुळे सामान्य व्य़क्ती असो किंवा लोकप्रतिनिधी नियम सर्वांना सारखेच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडका सुरूच ठेवला आहे. या कारवाईतून पालिकेकडे लाखोंचा दंड देखील जमा झाला आहे. सामान्य व्यक्तींसोबतच मोठ्या लोकप्रतिनिधींनाही दंड भरावा लागला असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना मंत्रालयतातून विनामास्क बाहेर पडताना पोलिसांनी हेरले. याच वेळी त्यांना थांबवून विनामास्क संचार केल्याप्रकरणी 200 रुपयांचा दंड ठोठवला.
मंगेश चव्हाण यांनी देखील लोकप्रतिनिधी असो किंवा सामान्य लोकं नियम सर्वांनाच सारखे असतात असे सांगून पोलिसांनी सांगितलेला दंड भरला. आमदारावर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे मात्र कौतुक होत आहे.