नवी मुंबई : आधुनिकीकरणाच्या ओघाने जात असतानाच नकळत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आता अनेकांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे. बदलतं ऋतूचक्र, त्याचा मानवी जीवनशैली, पर्यावरण आणि प्राणीमात्रांवर होणारा थेट परिणाम या गोष्टींकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज भासू लागली आहे. तंत्रज्ञान आणि प्रगती या गोष्टी विकासासाठी महत्त्वाच्या असल्या तरीही पर्यावरणाचा समतोल राखूनच त्या साध्य झाल्या पाहिजेत हीच बाब सध्याची तरुणाई आणि अनेक स्वयंसेवी संस्था उचलून धरत आहेत. याचच अनोखं उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे.
खारफुटी जमीन, मँग्रूव्हची झाडी, खाडीचा परिसर हे एकमेकांशी निगडीत असणारे पर्यावरणीय घटक आणि त्यांचं महत्त्वं पाहता ज्या वेगाने त्यांचा ऱ्हास होत आहे ती अत्यंत चिंतेची बाब आहे. हेल लक्षात घेत 'वंडरिंग सोल्स' Wandering Souls आणि Save Navi Mumbai Environment group यांच्या संयुक्त विद्यमाने एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मँग्रूव्हचं एक रोपटं देण्यात येणार आहे. त्यामुळे ही संकल्पना खऱ्या अर्थाने सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.
नवी मुंबई परिसरात असणारी समृद्ध जैवविविधता पाहता मँग्रूव्ह म्हणजेच खारफुटीच्या वनांची दाटी कमी न होऊ देण्यासाठीच हे प्रयत्न सुरु असून सोबतच दरवर्षी भारतात येणाऱ्या फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठीची जनजागृतीही या मॅरेथॉनच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर ५८ A येथून या मॅरेथॉनला सुरुवात होणार असून, पाच आणि दहा किलोमीटर अशा दोन प्रकारांमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यविषयीची अधिक माहिती bit.ly/runforflamingos या लिंकवर उपलब्ध असून आठवड्याचा एक दिवस, खरंतर एक सुट्टी एका अनोख्या आणि तितक्याच सुरेख अशा कामासाठी व्यतीत करण्याला अनेकांनी प्राधान्य दिलं आहे.