Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात जबर फटका बसला. त्यावरुन संघाचं मुखपत्र ऑर्गनायजरमधून अजित पवारांवर (Ajit Pawar) खापर फोडण्यात आलं होतं. आता संघाशी संबंधित असलेल्या विवेक साप्ताहिकातही (Vivek Magazine) अजित दादांवरच निशाणा साधण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांमुळेच भाजपचं (BJP) नुकसान झाल्याचं साप्ताहिक विवेकमध्ये म्हटलंय..
काय लिहिलंय साप्ताहिक विवेकमध्ये
लोकसभेतील (Loksabaha Election 2024) अपयशाची कारणं सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतंच. शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेलं अंतर्गत बंड, एकनाथ शिंदेंचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या.
हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं. मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते आणि आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळं असतं; परंतु जर ही गणितं चुकताना दिसत असतील तर त्याचं काय करायचं, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसंच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असलं तरी तेवढंच एक मुख्य कारण आहे असं मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे, असं यात लिहिण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधले संबंध दुरावल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय. सरसंघचालक मोहन भागवतांनीही लोकसभेच्या निकालानंतर भाजपचे कान टोचले होते. त्यानंतर आता संघाशी संबंधित साप्ताहिकांनीही भाजपच्या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना पक्षावर बोचरी टीका केलीय. यावर कोण काय बोलतं त्याविषयी बोलण्यास बांधिल नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय.
भाजपाच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीवरच साप्ताहिक विवेकमधून खापर फोडण्यात आलंय. अजित पवारांसोबतच्या युतीवर भाजपला संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकनेही आता आरसा दाखवलाय.. आणि भाजपला तिखट प्रश्नही विचारलेत..