Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे (Shivsena) पक्ष प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्याकडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला होता.
त्यानंतर शिंदे गटाकडूनही शिवसेनेच्या आमदारांना राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता. पण ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे व्हिप मोडणाऱ्या आमदारांविरोधात शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.
या आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भरत गोगावले यांनी पत्रात केली आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रात 14 आमदारांची नावं आहेत. यातून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारवंत आहेत, आणि विचार करुनच त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलं आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणार नाही, आम्हालाही काहीतरी जाणीव आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.