Woman BEST Driver : रिक्षा चालक ते बेस्ट बस ड्रायव्हर, लक्ष्मी जाधव यांच्या हाती बसचं स्टेअरिंग

कौतुकास्पद, मुंबईत लवकरच बस चालवणारी पहिली महिला चालक होणार रुजू

Updated: May 25, 2022, 09:01 PM IST
Woman BEST Driver : रिक्षा चालक ते बेस्ट बस ड्रायव्हर, लक्ष्मी जाधव यांच्या हाती बसचं स्टेअरिंग title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : काही नोकर्‍या फक्त पुरुषांसाठी असतात या समजाला छेद देत मुंबईच्या 42 वर्षीय लक्ष्मी जाधव या मुंबईच्या बेस्ट (BEST) बसच्या पहिल्या महिला चालक म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. लक्ष्मी जाधव या रिक्षा ड्राईव्हर होत्या. आता नवीन इनिंग सुरू करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. सध्या त्या दिंडोशी बस डेपोमध्ये ट्रेनिंग घेत आहेत आणि लवकरच त्या मुंबईमध्ये आपल्याला बस चालवताना दिसतील.

बस चालवण्याचे होते स्वप्न
लक्ष्मी जाधव या आधी रिक्षा चालवत असत. मात्र एक ना एक दिवस बस चालवणार अशी महत्वाकांक्षा त्यांनी मनाशी बाळगली होती. त्यांची ही महत्वाकांक्षा आता पूर्ण होत आहे. 2016 मध्ये वडाळा RTO कडून ऑटोरिक्षा परमिट मिळवणाऱ्या त्या पहिला महिला ड्राईव्हर ठरल्या होत्या. 

लक्ष्मी जाधव यांनी BMW आणि मर्सिडीज सारख्या लक्झरी कारही चालवल्या आहेत. आता बस ड्राईव्हर म्हणून काम केल्यानंतर महिलांना विविध गाड्या चालवण्याचं ट्रेनिंग देण्याचंही त्यांचे स्वप्न आहे. 

सासूला लक्ष्मी यांचा अभिमान
लक्ष्मी जाधव सांगतात की त्यांना त्यांच्या पतीकडून नेहमीच मोठा पाठिंबा मिळत आलेला आहे. याबद्दल त्या कृतज्ञ आहे. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा इंजिनिअरिंग तर दुसरा मुलगा बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. आपल्या सासूला आपला खूप अभिमान वाटतो आणि आणि घरी गेल्या गेल्या त्या आपल्याला पाणी पिण्यासाठी पाण्याचा ग्लास आणून देतात असं त्या मोठ्या कौतुकाने सांगतात. तर शेजारी आणि परिसरातील लोकांनाही लक्ष्मी यांचा मोठा अभिमान वाटतो.

लक्ष्मी जाधव बस चालवताना कधी दिसणार ?
मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पहिल्या महिला ड्राईव्हर असलेल्या बसच्या राईडला हिरवा झेंडा दाखवतील तेव्हा बेस्ट बस चालक म्हणून त्यांची नोंद होईल. बेस्टच्या आणखी दोन महिला ड्रायव्हरला प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या बेस्टमध्ये 91 महिला कंडक्टर आहेत.